Sun, Aug 18, 2019 14:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बॅनरवरून महामेळाव्यात मुंडे समर्थकांची घोषणाबाजी 

बॅनरवरून महामेळाव्यात मुंडे समर्थकांची घोषणाबाजी 

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 1:12AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाजपच्या महामेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची नाराजीमुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. व्यासपीठ तसेच मेळाव्याच्या ठीकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी व्यासपीठासमोर काही काळ घोषणाबाजी केली. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांनी सभामंडपात जावून त्यांची समजूत काढल्याने हा गोंधळ थांबला. सभेला सुरुवात झाल्यानंतर व्यासपीठाच्या समोर पंकजा मुंडे यांचे समर्थक जमा झाले. त्यांच्या हातात गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांचे फोटो असेलेले फलक होते. गोपीनाथ मुंडे अमर रहे, पंकजा मुंडे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा ते देऊ लागले. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

व्यासपीठावरुन पंकजा मुंडे तर व्यासपीठाजवळून खा. प्रितम मुंडे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच होती. महामेळाव्याच्या ठीकाणी गोपीनाथ मुंडे यांचा फोटो की बॅनरही लावण्यात आलेला नसल्याने आम्ही नाराज असल्याचे ते सांगत होते. शेवटी प्रितम मुंडे या खाली उतरुन मंडपातील कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर हा गोंधळ थांबला. मात्र, जेव्हा जेव्हा गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाचा उल्लेख होईल त्यावेळी कार्यकर्ते टाळ्या आणि शिट्टया वाजवित होते. 

भाजपने या महामेळाव्याने लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. या महामेळाव्याला राज्यभरातून लाखो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी 5 लाख कार्यकर्ते उपस्थित राहील्याचा दावा केला. या महामेळाव्यासाठी तीन भव्य सभा मंडप उभारण्यात आले होते. शेलार यांनी हा महामेळावा दिड लाख चौरस मीटर जागेत झाल्याचे सांगितले. मुख्य व्यासपीठावर अमित शहा, केंद्रीय मंत्री आणि कोअर टीमचे नेते होते. तर, बाजुल्या दोन व्यासपीठावर राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि प्रदेश पदाधिकारी यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

अमित शहा यांच्या आगमनावेळी काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमुळे मोठी वहातूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागल्याने भाजपला टीकाही सहन करावी लागली. आशिष शेलार यांनी या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आजच्या महामेळाव्यामुळे मुंबईतील वहातुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे  सांगितले. 
 

 

 

tags : Mumbai,news, BJP's, rally, Pankaja, Munde, supporters, displeasure,