होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षण हटवणार नाही!

आरक्षण हटवणार नाही : अमित शहा

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 1:39AMमुंबई : खास प्रतिनिधी

आरक्षण हटवणार नाही आणि हटवूही देणार नाही, अशी ग्वाही देत नरेंद्र मोदींकडे चार वर्षांचा हिशेब  मागणार्‍या राहुल गांधी यांनी आधी त्यांच्या चार पिढ्यांनी काय केले, याचा हिशेब देशातील जनतेला द्यावा, असा हल्‍लाबोल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई येथील भाजपच्या महामेळाव्यात शुक्रवारी केला.  भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्ताने मुंबईत पक्षाचा प्रचंड मेळावा झाला. या मेळाव्यात  शहा यांनी विरोधकांवर कडाडून टीका करताना भाजपच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजप कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रत्येक कोपर्‍यात कमळ फुललेले दिसत असले, तरी हा अत्यंत कठीण प्रवास होता, असे शहा म्हणाले.

भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळेच आज हा दिवस दिसू शकला, असे त्यांनी स्पष्ट केले. 2019 च्या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून,  सरकारची कामे घेऊन लोकांपर्यंत जा, असे आवाहन शहा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. पवारांनी इंजेक्शन दिल्यावर राहुल बोलतात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर प्रतिहल्ला चढवला.

राहुल हे आता शरद पवारांच्या साथीने फिरू लागले असून, पवारांनी इंजेक्शन दिल्यानंतर त्यांनी मोदी यांच्याकडे गेल्या चार वर्षांचा हिशेब मागायला सुरुवात केली आहे. मात्र, जनता तुमच्याकडे चार पिढ्यांचा हिशेब मागतेय. नरेंद्र मोदींनी उज्ज्वल योजना, मेडिक्लेम अशा  आरक्षण हटवणार नाही, हटवू देणार नाही योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवले, तुम्ही इतकी वर्षे सत्ता  उपभोगून काय केले? असा सवाल शहा यांनी विचारला.

उरीचा बदला घेतला

सीमेवर हल्ले होत होते आणि आपल्या जवानांची मुंडकी छाटली जात होती, त्यावेळी तेव्हाच्या सरकारला काही फरक पडत नव्हता; पण आम्ही उरीचा बदला घेतला. संपूर्ण जगात एक वेगळा संदेश गेला. देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, असे अमित शहा म्हणाले. विरोधकांच्या सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करायला आम्ही तयार होतो. मात्र, विरोधकांनी संसद चालू दिली नाही. आम्ही उत्तर प्रदेशात पोटनिवडणूक हरलो; पण राहुल गांधी तुमच्या पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले, आपल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्यानंतरही मिठाई वाटणारा पक्षाध्यक्ष देशाने पाहिला, असा टोला लगावताना भाजपने पोटनिवडणुकीत दोन जागा गमावल्या; पण 11 राज्यांत तुम्हाला सत्तेवरून हटवले, असे अमित शहा म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चालवलेल्या प्रचारालाही शहा यांनी उत्तर दिले. मोदी सरकारने अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेले आरक्षण हटवल्याचा अपप्रचार विरोधक करीत असून, असे काहीही होणार नाही, असा दिलासा देताना मोदी सरकार आरक्षणाला हात लावणार नाही आणि कोणाला लावूही देणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले. शेतकरी आत्महत्या घटल्या मोदी आणि फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप कुणी करू शकलेले नाही. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा कमी झाला, असा दावा शहा यांनी केला. भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्ताने मुंबईत शुक्रवारी पक्षाचा प्रचंड मेळावा झाला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांची यावेळी भाषणे झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पियूष गोयल, राज्याचे मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेते यावेळी उपस्थित होते. राज्यभरातून भाजपचे लाखो कार्यकर्ते या मेळाव्यासाठी आले होते. कडाक्याच्या उन्हात कार्यकर्त्यांची उपस्थिती डोळ्यात भरणारी होती.

 

 

tags ; Mumbai,news,BJP, national, president ,Amit, Shah, promise, Reservations, will, not, delete, in BJP's, rally,