Wed, Jun 26, 2019 18:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आठवले, आंबेडकरांनी एकत्र यावे : डॉ. गवई

आठवले, आंबेडकरांनी एकत्र यावे : डॉ. गवई

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 12:22AMमुंबई : प्रतिनिधी 

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या प्रकरणानंतर राज्यव्यापी झालेल्या बंदमध्ये सहभागी झालेल्या व पोलिसांनी गुन्हे नोंदवलेल्या दलित समाजाच्या तरुणांना कायदेशीर व इतर मदत करण्याबाबत केवळ सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात त्या तरुणांना सोडवण्यासाठी पुरेशी उपाययोजना करण्यात आलेली नाही. या तरुणांना वाचवण्यासाठी व त्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी व तुरुंगातून व गुन्ह्यातून सोडवण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित येण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्ष (गवई गट) सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केले.

यावेळी पक्षाचे मुंबई अध्यक्ष आनंद खरात उपस्थित होते. यासंदर्भात शुक्रवारी गवई हे रामदास आठवलेंची भेट घेणार आहेत. एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादनासाठी जमलेल्या दलितांवर झालेला हल्ला भ्याड होता. त्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सामील झालेल्या दलित तरुणांवर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या निरापराध तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी दलित समाजाच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज गवई यांनी व्यक्त केली. ही वेळ दलित चळवळीतील विविध गटातटांनी आपापले शक्तिप्रदर्शन करण्याची नसून सामूहिक शक्ती दाखवत या तरुणांना वाचवण्याची गरज असल्याचे गवई म्हणाले. या प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामीन मिळाला आहे. मात्र, त्यांना कायमस्वरूपी जामीन मिळू नये, यासाठी सरकारने सक्षम व चांगला वकील नेमावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची माहिती गवई यांनी दिली.