Thu, Aug 22, 2019 03:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानसभा अध्यक्षांवर विश्‍वास ठराव मंजूर

विधानसभा अध्यक्षांवर विश्‍वास ठराव मंजूर

Published On: Mar 24 2018 2:06AM | Last Updated: Mar 24 2018 1:51AMमुंबई : प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेला अविश्‍वास ठराव चर्चेला येण्यापूर्वी सत्ताधारी पक्षानेच अध्यक्षांवर विश्‍वासदर्शक ठराव मांडला. आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर होताच विरोधक संतप्त झाले. लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करत विरोधकांनी यावर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ठराव मंजूर झाल्याने यावर बोलता येणार नाही, असे सांगून त्यांना परवानगी नाकारल्याने झालेल्या गदारोळात कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. 

शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कररचना विधेयक मांडले ते मंजूर करण्यावरून त्यांची व जयंत पाटील यांच्यात शाब्दिक चकमकही घडली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले व त्यांनी हे सभागृह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्‍वास व्यक्‍त करत असल्याचा एक ओळीचा तोंडी ठराव मांडला. त्यापाठोपाठ शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी या ठरावाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करताच ठरावावर आवाजी मतदान घेण्यात आले व हा ठराव मंजूर झाल्याचे तालिका अध्यक्षांनी जाहीर केले. 
कोणतीही कल्पना नसताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या खेळीने विरोधक अवाक्च झाले.

आपला प्रस्ताव चर्चेला येण्यापूर्वीच सरकारने  उलटविलेल्या या खेळीने विरोधकांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. हा ठराव मंजूर होताच सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतरही पुन्हा कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.  कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, आम्ही अध्यक्षांवर दि. 5 मार्च रोजी अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. वारंवार त्यावर आम्ही मागणी करत आहोत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी योग्यवेळी यावर निर्णय होईल असे संगितले होते, असे सांगितले .

त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार आक्षेप घेत ठराव मंजूर झाल्याने यावर बोलता येणार नसल्याचे ठामपणे सांगितले. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात दि. 21 जून 2006 रोजी सरकारवर आणलेल्या अविश्‍वास ठरावावेळीही असाच सरकारवरील विश्‍वास ठराव त्यांनी मांडला होता. त्याला हर्षवर्धन पाटील यांनी पाठिंबा दिल्याचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना त्याच न्यायाने हा ठराव आल्याचे सांगितले. 

मुख्यमंत्री बोलत असताना सत्ताधारी भाजपचे सदस्य जागा सोडून पुढे येऊन घोषणा देत होते. ‘फुसका रे फुसका विरोधकांचा बार फुसका’, ‘अध्यक्षांवर अविश्‍वास ठराव आणणार्‍या विरोधकांचा धिक्‍कार असो’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्याचवेळी दिलीप वळसे-पाटील हे पॉईंट ऑफ प्रोसिजरवर बोलायला उभे राहिले. ते या विश्‍वास ठरावावर बोलत असताना त्यावर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी हरकत घेतली. वळसे ज्या विषयांवर बोलत आहेत, तो विषयच सभागृहासमोर नसल्याने त्यांना बोलता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, वळसे बोलण्यावर ठाम होते. तर विरोधकांच्या घोषणा सुरू होत्या. या गदारोळात कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. जयंत पाटील व गिरीश बापट यांच्यातही शाब्दिक चकमक घडली.
 

 

tags : Mumbai,news,Assembly, Speaker, believes, resolution, Approved,