Wed, Aug 21, 2019 14:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो-1 : अंधेरी स्थानकावर बसवणार स्क्रीनडोअर्स

मेट्रो-1 : अंधेरी स्थानकावर बसवणार स्क्रीनडोअर्स

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी 

वर्सोवा-  अंधेरी- घाटकोपर या मेट्रो-1 मार्गिकेवर दरदिवशी प्रवाशांच्या संख्येेमध्ये वाढ होत आहे. घाटकोपर मेट्रो स्थानकानंतर प्रवाशांची वर्दळ अंधेरी या मेट्रो स्थानकावर असते हे लक्षात घेत या स्थानकावर स्क्रिन डोअर्स बसवण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पाठवला आहे. 

अंधेरी स्थानकावर बसवण्यात येणार्‍या प्लॅटफॉर्म स्क्रिन डोअर्समुळे गर्दीचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. हे स्क्रिन डोअर्स स्थानकामध्ये मेट्रो आल्यावर उघडणार असून मेट्रो गेल्यावर बंद होणार आहेत. अंधेरी मेट्रो स्थानकांतून प्रवास करणार्‍यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. दरदिवशी या स्थानकातून सुमारे चार लाख प्रवासी प्रवास करतात. अंधेरी मेट्रो स्थानकावर प्लॅटफॉर्मची जागा इतर स्थानकांच्या तुलनेमध्ये कमी असल्याने या स्थानकावर नियोजनाची नितांत गरज ओळखून हे स्क्रिन डोअर्स बसवण्यात येणार आहेत. अंधेरी स्थानकामध्ये अर्धे स्क्रिन डोअर्स बसवण्यात येणार आहेत. देशातील बहुसंख्य मेट्रो मार्गिकांमध्ये अशाप्रकारे स्क्रिन डोअर्स बसवण्यात आले आहेत. आम्ही भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आगाऊ योजना तयार करत आहोत, जेणेकरून आपली बांधिलकी पूर्ण करण्यास आम्ही सक्षम असू, असे एमएमओपीएलने स्पष्ट केले. तसेच आम्ही एमएमआरडीएकडे प्रस्ताव पाठवला आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.