Sun, Jul 21, 2019 09:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना सोबत  राहावी ही हार्दिक इच्छा : अमित शहा 

शिवसेना सोबत  राहावी ही हार्दिक इच्छा : अमित शहा 

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 1:29AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

महापूर आल्यानंतर घाबरलेले सर्व साप, मुंगूस, कुत्रे, मांजरे ज्याप्रमाणे वृक्षाचा आसरा घेतात त्याप्रमाणे सगळे विरोधक मोदी नावाच्या महापुरापासून बचावण्यासाठी एकत्र आले आहेत. अमित शहा यांनी पक्षाचा पुढील कार्यक्रम जाहीर करताना 11 एप्रिल ही महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती भाजप देशभर साजरी करणार असून त्याव्दारे देशाला विभाजित करणार्‍यांना लोकशाही पध्दतीने उत्तर दिले जाईल, असेही शहा यांनी सांगितले.

तसेच 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून ते 5 मे पर्यंत भाजप कार्यकर्ते देशातील 20 हजार गावात जावून तेथे मुक्काम करुन सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला देतील हे सांगतानाच मंत्री, खासदार आणि आमदारांवर क्षेत्रीय जबाबदार्‍या निश्‍चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय संसद चालू न देणार्‍या विरोधकांचा निषेध करण्यासाठी भाजपकडून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.  

केंद्र आणि राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपचे सबंध फारसे चांगले राहीले नसताना आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी दिले. शिवसेना निवडणुकीत सोबत रहावी ही आमची हार्दिक ईच्छा असल्याचे सांगतानाच केंद्रातही पुन्हा एनडीएचीच सत्ता येईल, असे अमित शहा म्हणाले. ते भाजपच्या महामेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

महामेळाव्यातील भाषणात अमित शहा यांनी राज्यात पुन्हा युतीचे सरकार येईल असे वक्तव्य केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता अमित शहा यांनी निवडणुका शिवसेनेच्या सोबतीने लढविण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच भाजपने साडेतीनशे खासदार निवडूण आणण्याचा संकल्प केला असला तरी भाजप आपल्या घटक पक्षांना सोबत घेईल, असे ते म्हणाले.  नरेंद्र मोदी यांची लाट असल्यामुळे घाबरलेले विरोधक आज एकत्र येत आहेत. त्यांची विचारधारा जुळत नसली तरी ते भितीपोटी एकत्र येत आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी असो की काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस असो त्याचा तोच अर्थ आहे. मात्र, निवडणुका आल्या की आघाड्या या होतच असतात. चंद्राबाबू नायडू गेले असले तरी भाजपचे दुसरे घटक पक्ष हे सोबत आहेत. घटक पक्ष कुठेही कमी झालेले नाहीत, असेही शहा म्हणाले. 

स्वत:च्या स्वार्थासाठी काही पक्ष हे देशाला तोडण्याचे काम करीत आहेत. परंतु, ते आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होणार नाहीत. पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील, असा ठाम विश्‍वासही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. काँग्रेसची सत्ता गेल्याने त्यांना अच्छे दिन दिसत नाहीत. मात्र, राज्य सरकारने गरीब, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नरेंद्र मोदी यांनी देशाला संवेदनशील आणि पारदर्शक सरकार दिले आहे. कश्मिरमध्ये अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे, असेही अमित शहा यांनी सांगितले. 
 

 

 

tags : Mumbai,news,Alliance, with, ShivSena, Lok, Sabha ,elections,issue in bjp rally