Sat, Feb 23, 2019 18:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२३ पर्यंत धावणार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२३ पर्यंत धावणार

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:37AMअहमदाबाद :

मुंबई-अहमदाबाद या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प वर्ष 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबईतील जपानच्या वकिलातीचे कौन्सेल जनरल रयोजी नोडा यांनी दिली.  इंड्रो-जपान फे्रंडशिप असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश पटेल यांना जपानच्या ऑर्डर ऑफ दी रायझिंग सन या किताबाने सन्मानित करण्यात आले. यनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात नोडा बोलत होते. जपान आणि भारत हे दोघे जागतिक आणि धोरणात्मक भागीदार आहेत. जपानचे पंतप्रधान शिन्जो अबे यांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये गुजरातला भेट दिल्यानंतर दोन्ही देशातील संबंध अधिकच वृद्धिंगत झाले.

त्यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्घाटन केले होते.  भारतातील पर्यटकांनी जपानमध्ये यावे यासाठीही आम्ही प्रोत्साहन देत आहोत. सध्या जपानमध्ये येणारे सर्वाधिक पर्यटक हे चीनमधील असतात. दरवर्षी 2.3 दशलक्ष चिनी पर्यटक जपानमध्ये येतात. त्या तुलनेत भारतातून फक्‍त 1 लाख 20 हजार पर्यटक जपानला भेट देतात. 2023 पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येतील 50 टक्के लोकसंख्येचा समावेश मध्यम उत्पन्न गटात होईल. या उत्पन्न गटाला जपानकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी आम्ही आमची व्हिसा प्रक्रिया सौम्य केली आहे. तसेच बहु व्हिसा प्रणाली सुरू केल्याचेही नोडा यांनी पत्रकारांना सांगितले.