होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एपीएमसी नव्हे, आता ‘मार्केट कमिटी ऑफ नॅशनल इम्पॉर्टंट’!

एपीएमसी नव्हे, आता ‘मार्केट कमिटी ऑफ नॅशनल इम्पॉर्टंट’!

Published On: May 18 2018 11:58AM | Last Updated: May 18 2018 11:58AMनवी मुंबई: प्रतिनिधी

आशिया खंडातील शिखर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा दर्जा देऊन बाजार समितीत मोठे फेरबदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई एपीएमसी लवकरच मार्केट कमिटी ऑफ नॅशनल इम्पॉर्टंट या नावाने येत्या दोन महिन्यांत नावारुपाला येणार आहे. याबाबतचा अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे संकेत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढारीशी बोलताना दिले.

मुंबई उत्पन्न बाजार समितीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

मुंबई एपीएमसीची स्थापना 15 जानेवारी 1977 साली करण्यात आली असून 1996 मध्ये मुंबईतून बाजार आवाराचे स्थालंतर नवी मुंबईतील तुर्भे येथे करण्यात आले. मुंबईतील वाढती गर्दी लक्षात घेऊन त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता. 1996 मध्ये हा प्रकल्प उभा करण्यासाठी 277 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. पाच घाऊक बाजारपेठांसह मुख्यालय 72.50 हेक्टर जागेत उभे केले आहे. या घाऊक बाजारात रोज 3500 हजार वाहनांची आवक होते. तर घाऊक शेतमालाची वार्षिक उलाढाल ही 10000 कोटींपेक्षा अधिक आहे. 

या बाजार समितीवर राज्यातील शेतकरी प्रतिनिधीसह पाच घाऊक बाजारातील प्रतिनिधी संचालक म्हणून निवडून येत होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर युती सरकारने मुदतवाढ न देताच प्रशासक बसविण्याचा निर्णय घेतला. पहिले प्रशासक म्हणून मनोज सौनिक आणि त्यानंतर आता सतीश सोनी यांना नियुक्त करण्यात आले. तर सचिव म्हणून अपर निबंधक दर्जाचे अधिकारी शिवाजी पहिनकर सध्या कारभार पाहत आहेत. मात्र या बाजार समितीला आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे बाजार संकुल बनविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तो अंतिम टप्प्यात आहे. 

मार्केट कमिटी ऑफ नॅशनल इम्पॉर्टंट या नावाने (एमएनआय) नावारुपाला येणार आहे. यावर येत्या जुलैअखेर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर या बाजार समितीचे अध्यक्ष हे पणनमंत्री असणार असून उपाध्यक्ष तथा मुख्यधिकारी हे नवीन पद तयार केले जाणार आहे. या व्यतिरिक्त अ‍ॅफेडा, नाफेड, वेअरहाऊसिंग कॉपोरेशन, रेल्वे साईटिंग, कस्टम, राष्ट्रीयकृत बँक आणि महापालिका यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि पाच मार्केटचे पाच व्यापारी प्रतिनिधी म्हणून घेतले जाणार आहेत.
Tags :mumbai apmc, mumbai, Market Committee of National Impact, Mumbai Agricultural Produce Market Committee