Wed, Apr 24, 2019 11:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घाटकोपरवर विमान कोसळून पाच ठार

घाटकोपरवर विमान कोसळून पाच ठार

Published On: Jun 28 2018 1:38PM | Last Updated: Jun 28 2018 3:49PMमुंबई : प्रतिनिधी

अपघातानंतर दुरुस्त करण्यात आलेल्या व्हीटी यूपीझेड किंग एअर सी-90 या छोट्या विमानाचे चाचणी उड्डाण फसले आणि ते सरळ घाटकोपरमध्ये कोसळले. गुरुवारी दुपारी माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारातच हे विमान कोसळून वैमानिकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विमान घाटकोपरवर असतानाच बिघडले आणि नियंत्रणाबाहेर गेले. तरीही प्रसंगावधान राखत पायलट मारिया झुबेरी यांनी प्रचंड लोकवस्तीच्या इमारतींना जीवदान देत ते बांधकाम सुरू असलेल्या जागेकडे वळवून घाटकोपरला जीवदान दिले. 

मृतांमध्ये पायलट मारिया झुबेरी, प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनिष पांडे तसेच पादचारी गोविंद पंडित यांचा मृत्यू झाला तर जखमींमध्ये लवकुश कुमार, प्रशांत महाकाल आणि नरेशकुमार निशाद या कामगारांचा समावेश आहे. 

दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी हवेत कोलांट्या घेत हे विमान अत्यंत वेगाने घाटकोपरमध्ये कोसळले. काही सेकंदातच मोठा स्फोट होऊन विमानात आग लागली. स्फोटाची आणि आगीची तीव्रता इतकी होती की पाचशे मीटरपेक्षा जास्त अंतरावर विमानाचे अवशेष फेकले गेले. बाजूलाच असलेल्या इमारतीच्या तिसर्‍या मळ्यापर्यंत आगीच्या ज्वाळा झेपावल्या. काही वेळ कोणाला काय झाले काहीच कळले नाही. विमानाने आणि त्यातून निघणार्‍या इंधनाने पेट घेतला होता. हे विमान सुरुवातीला खाली येताना ज्या झाडाला आदळले ते झाड देखील पूर्णपणे तुटून पडले होते. नेमके काय घडले कुणालाच कळत नव्हते. हा घातपात तर नव्हे, या शंकेने तणाव निर्माण झाला. मात्र, थोड्याच वेळात चार्टर्ड विमान कोसळून हा स्फोट झाल्याचे स्पष्ट होताच स्थानिक पोलिसांसह मनपा, एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलासह विमान कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोसळलेले 12 आसनी व्हीटी यूपीझेड किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान पूर्वी उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे होते. 2013 साली या विमानाला अलाहाबाद शहरात अपघात झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने ते गुटखा किंग दीपक कोठारी बंधूंच्या यूवाय एव्हिएशन कंपनीला विकले. अपघातामुळे विमानात प्रचंड बिघाड झाला होता. प्रदीर्घ काळ त्याच्या दुरुस्त्या करण्यात आल्यानंतर ते उड्डाणासाठी सज्ज आहे की नाही याची गुरुवारी तपासणी होणार होती. गुरुवारी सकाळी या विमानाची विधिवत पूजा करण्यात आली.  श्रीफळ वाढवल्यानंतर पायलट मारिया झुबेरी, प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चौघांसह विमानाने जुहूच्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतले. विमान महिला पायलट मारिया झुबेरी चालवित होत्या. त्यांच्या शेजारी प्रदीप राजपूत हे विमानाचे दुसरे पायलट बसले होते. विमान घाटकोपरवर असतानाच विमानात बिघाड झाला. विमान नियंत्रणात नाही आणि खाली घाटकोपरसारखा प्रचंड लोकवस्तीचा परिसर. विमान कुठेही कोसळण्याची शक्यता होती.

स्वत:चा जीव धोक्यात असतानाही पायलट मारिया यांनी प्रसंगावधान दाखवत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुलनेने कमी गर्दी असलेल्या जागी विमान कोसळले आणि परिसरातील इमारतींना जीवदान मिळाले. अन्यथा मोठी मनुष्यहानी झाली असती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. भरवस्तीत विमान कोसळणे हा प्रकार गंभीर असून, त्याची सखोल चौकशी केली जाईल. घडला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र या दुर्दैवातही सुदैव असे की बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विमान पडल्याने मोठी मनुष्यहानी झाली नाही. 

मुंबई  हवाई वाहतूक  महासंचालनालयाच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. या अपघाताचा तपास आता एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करणार आहे.  विमान दुर्घटनेची माहिती मिळताच कलिना न्यास सहाय्यक प्रयोगशाळेचे प्रमुख जितेंद्र जावळे हे त्यांच्या तीन सहकार्‍यांसोबत घटनास्थळी रवाना झाले. तसेच या प्रयोगशाळेची एक सपोर्ट व्हॅनही तिथे तैनात होती. घटनास्थळाहून जास्तीत जास्त महत्त्वाचे पार्ट्स या अधिकार्‍यांनी गोळा केले. विमान दुर्घटना कशी झाली, आग लागण्यामागील कारण काय होते, त्यात किती इंधन होते, कुठल्या प्रकारचे इंधनाचा वापर झाला होता. याचा आता या अधिकार्‍यांकडून तपास सुरु आहे. विमान दुर्घटनेनंतर दोन वाजता पहिला मृतदेह राजावाडी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते, त्यानंतर अर्ध्या तासात इतर चार मृतदेह आणण्यात आले. मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास कोणीही तयार नव्हते. 
 

मुंबईतील गजबजलेल्या घाटकोपर परिसरात गुरुवारी दुपारी एक चार्टर्ड विमान कोसळले. या अपघातात वैमानिकासह 3 तंत्रज्ञ आणि एका पादचारी अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.घटाकोपर पश्चिमेकडील जीवदयालेन मार्गावर हा अपघात झाला. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहेत. विमानावर उत्तर प्रदेश सरकारचा लोगो आहे. पण त्यांनी या विमानाची काही वर्षांपूर्वी विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   

वाचा : पायलट मरियांच्या शौर्याला सलाम

मुंबईतील घाटकोपर परिसरातील सर्वोदय रुग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळले. या विमानाने जुहु हेलिपॅडवरून चाचणीसाठी उड्डाण केले होते. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस, अग्निशमन दलांकडून घटनास्थळी मदत कार्य सुरु आहे.  

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे

> कॅप्टन मारिया (मुंबईच्या रहिवाशी)

> को-पायलट कॅप्टन प्रदीप रजपूत

> इंजिनिअर- सुरभी

> टेक्निशियन- मनीष पांडे 

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टाळला

जुहू हेलिपॅडवरून उड्डाण केलेल्या व्हीटी- युपीझेड-किंग एअर-90 हे विमान घाटकोपरमधील ज्या परिसरात कोसळले तो संपूर्ण भाग हा रहिवाशी आहे. अत्यंत गजबजलेल्या या परिसरात जर विमान एखाद्या रहिवाशी इमारतीवर कोसळले असते तर मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली असती. पण विमानातील महिला पायलटने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टाळला. महिला पायलटने विमान एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर लँन्ड करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले पण विमानातील चौघांचा आणि एका पादचऱ्याचा मृत्यू झाला.   

याआधी महाराष्ट्रात झालेले विमान अपघात

> एप्रिल 2017 मध्ये गोंदियात विमान कोसळले- दोघांचा मृत्यू
> डिसेंबर 2017मध्ये धुळ्यात विमानाला अपघात- दोन जण जखमी
> मार्च 2018मध्ये रायगडमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे विमान कोसळले- काही जण जखमी