Fri, Apr 26, 2019 03:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मच्छीमार जेट्टींसाठी 415 कोटी मंजूर : महादेव जानकर 

मच्छीमार जेट्टींसाठी 415 कोटी मंजूर : महादेव जानकर 

Published On: Apr 11 2018 4:56PM | Last Updated: Apr 11 2018 4:56PMमुंबई : प्रतिनिधी

मच्छीमारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार अनेक पायाभूत सोयी- सुविधा निर्माण करत आहे. मासेमारीसाठी एचडीपीई  बोट तसेच अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून मच्छीमारांनी स्वत:ची प्रगती साधावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. केंद्र सरकारच्या नीलक्रांती धोरणाच्या माध्यमातून नवीन मच्छीमार जेट्टी बांधकामासाठी 415 कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मच्छीमारनगर (कफ परेड) येथे नवीन अत्याधुनिक एचडीपीई मच्छीमार नौकेचे सादरीकरण मंत्री जानकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात कष्ट पडतात. पारंपरिक लाकडी बोटींचे तसेच फायबर बोटींचे आयुष्य खूप कमी आहे. या बोटींचा देखभाल दुरुस्ती खर्चही मोठा आहे. त्या तुलनेत  आधुनिक एचडीपीई बोटीचे आयुष्‍य 20 वर्षाहून अधिक आहे. एलपीजी इंजिन किंवा इलेक्ट्रिक इंजिनचा वापरही या बोटींमध्ये करण्यात येत असल्याने त्या पर्यावरणपूरक असून डिझेलसाठीचा मोठा खर्च आणि वाचणार आहे. या बोटींसाठी सोलर इंजिनचाही वापर शक्य असल्याने पूर्णत: प्रदुषणमुक्त आणि पैशाची बचतही होऊ शकते. मच्छीमारांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उन्नती साधावी, असे जानकर म्हणाले.

नीलक्रांती धोरणाच्या माध्यमातून  नवीन जेट्टी बांधकामासाठी 415 कोटी रूपये मंजूर केले आहेत. नवीन आधुनिक जेट्टींच्या बांधकामामुळे मच्छीमारांना मासे उतरवून जवळच्या बाजारपेठेपर्यंत वाहतूक करणे सोपे होणार आहे.  मत्स्योत्पादनाला अधिकचा दर मिळावा यासाठी मासे व अन्य मत्स्योत्पादनावर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्याचे मत्स्यविकास महामंडळ यापूर्वी तोट्यात होते ते सरकारच्या योग्य धोरणामुळे सध्या नफ्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

एचडीपीई बोटी या लिटमस मरीन इनोव्हेशन प्रा. लि. आणि क्वाड्रील हेवी इंजिनिअरींग यांच्या संयुक्त भागीदारीतून फ्रान्सवरून आयात केल्या असून, जर्मन तसेच जपानवरून आयात करण्यात आलेल्या इंजिनचा यामध्ये वापर करण्यात आलेले आहे.