होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात पाण्याचाही भडका!

राज्यात पाण्याचाही भडका!

Published On: Jan 19 2018 10:33PM | Last Updated: Jan 20 2018 10:59AMमुंबई : प्रतिनिधी

घरगुती, शेती वापरासाठीच्या पाणीदरात 17 टक्के, तर औद्योगिक वापराच्या पाणीदरात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतला असून येत्या एक फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बीयर उत्पादक उद्योगांसाठी मात्र ही दरवाढ जबर असून आता या उद्योगांना एक हजार लिटरला 16 रुपयांवरून 120 रुपये द्यावे लागणार आहेत. 2010 नंतर पहिल्यांदाच पाण्याचे दर वाढणार आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या बेकायदा पाणी वापरावरही जबर दंड वसूल करण्याची तरतूद नियमन प्राधिकरणाने केली आहे. या दरवाढीमुळे सरकारच्या तिजोरीत दरवर्षी 1 हजार 16 कोटी रुपये येणार आहेत. सध्या 650 कोटी रुपये पाणीपट्टीतून मिळतात.

जलसंपत्ती प्राधिकरणाने शुक्रवारी ही घोषणा केली. आता पाण्याच्या व्यवस्थापनावर होणार्‍या एकूण खर्चापैकी 59 टक्के औद्योगिक वापरातून, 22 टक्के घरगुती आणि 19 टक्के वसुली शेती क्षेत्रातून केली जाईल, असे जलनियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी सांगितले. शेतीसाठी पाण्याचा दर रब्बीसाठी नऊ रुपये प्रतिहजार लिटर्स, खरिपासाठी 4 रुपये 50 पैसे प्रतिहजार लिटर आणि उन्हाळी हंगामासाठी 13 रुपये 50 पैसे इतका होणार आहे. पाणीवापर संस्था स्थापन केल्यास या दरात 25 टक्के सूट दिली जाईल. सूक्ष्म सिंचनास प्रोत्साहन देण्यासाठी 25 टक्के सूट दिली जाणार आहे. शासकीय उपसा सिंचन योजनेवरील शेतकर्‍यांना पाणीपट्टीसह केवळ 19 टक्के वीज बिल द्यावे लागणार आहे. पूर्वीच्या क्षेत्रानुसार पाणीपट्टी आकारण्याची पद्धत बदलून आता घनमापन पद्धतीने पाणीपट्टी आकारली जाणार असून त्यामुळे पाण्याची बचत करणार्‍यास कमी पाणीपट्टी बसणार आहे.

ग्रामपंचायतीसाठी पाणी वापराची मर्यादा प्रतिव्यक्‍ती 40 लिटर्सवरून 55 इतकी करण्यात आली असून निमशहरी भागासाठी प्रतिव्यक्‍ती 70 लिटर मर्यादा करण्यात आली आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी 70, तर ‘ब’ वर्ग नगरपालिकांसाठी 100 आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांसाठी 125 लिटर्स प्रतिव्यक्‍ती पाणीवापर मर्यादा करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी धरणातून पाणी घेणार्‍या महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींसाठी प्रतिघनमीटर 25, 18 आणि 15 पैसे इतका दर करण्यात आला आहे. पाण्याचा वापर जपून व्हावा, यासाठी वीज बिलाचेही तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार पाणीवापर मर्यादेच्या 115 ते 140 टक्के अधिक पाणी वापरल्यास दीडपट आणि त्यापेक्षा अधिक वापर झाल्यास दुप्पट वीज बिल लावले जाणार आहे.

औद्योगिक वापरासाठी थेट धरणातून पाणी घेतल्यास 4 रुपये 80 पैसे प्रतिघनमीटर इतका दर आकारला जाणार असून कृषी उद्योगांसाठी मात्र या दरात 25 टक्के सवलत दिली जाणार आहे. मीटर न घेता पाणी दीडपटीने महाग धरणातील पाणी मीटर न बसवता घेणार्‍या नगरपालिका आणि महापालिका आणि उद्योगांना दीडपट दर द्यावा लागणार आहे.