Mon, Apr 22, 2019 06:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबादेवी मंदिर सरकारच्या नियंत्रणात

मुंबादेवी मंदिर सरकारच्या नियंत्रणात

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 2:04AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील लाखो जनतेचे श्रद्धास्थान असलेले मुंबादेवी मंदिर आता सरकारच्या नियंत्रणात येणार आहे. या मंदिरावर पंढरपूर, सिद्धिविनायक, शिर्डीप्रमाणे राज्य सरकार स्वतंत्र विश्‍वस्त मंडळ नियुक्त करणार आहे. मूळ कोळी समाजाचे दैवत असूनही मुंबादेवी मंदिरावर ताबा होता तो खासगी विश्‍वस्तांचा. त्यांच्या कब्जातून मंदिर अखेर मुक्‍त होऊ घातले आहे. आता स्थापन होणार्‍या विश्‍वस्त मंडळावर कुणाकुणाची वर्णी लागते याबद्दल उत्सुकता असून, नवी धर्मसत्ता स्पर्धा सुरू झाली आहे.

काय होता वाद ?

मुंबादेवी ट्रस्टकडे लाखो रुपयांची देणगी जमा होते. मात्र याचा हिशोब सरकारदप्तरी दाखवला जात नाही. मुंबादेवी मंदिर ट्रस्टकडून भाविकांच्या सोयीसुविधाकडे दुर्लक्ष केले जाते. शिर्डी, पंढरपूर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समित्यांसह सिध्दिविनायक मंदिर ट्रस्टने भाविकांसाठी चांगल्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. रुग्णसेवेसोबतच विद्यार्थी व ग्रामीण भागातील जनतेला ही देवस्थाने कठीण प्रसंगामध्ये मदत करतात. पण मुंबादेवी ट्रस्टने आतापर्यंत कोणालाही भरीव मदत केली नाही. त्यामुळे या देवस्थानवर सनदी अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मागणी भाजपा आमदार राज पुरोहीत यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी आंदोलन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले होतेे.

मुंबादेवी मंदिर कोणाचे?

मुंबादेवी ही कोळी समाजाचे कुलदैवत असून मंदिर व्यवस्थापन कोळी महासंघाकडे देण्यात यावे अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी केली होती. मुंबई ही भूमिपुत्र कोळी बांधवांची मूळ वस्ती असून मुंगादेवी अर्थात मुंबादेवी ही मासेमारी आणि जलवाहतूक करणार्‍या आदिवासी कोळी जमातीचे कुलदैवत आहे, असे टपके यांचे म्हणणे आहे. मुंगाबाई या कोळी भक्तीणेचे हे स्मृती मंदिर कोळी समाजाने पूर्वापार जपले होते. सागरात हीच मुंगादेवी मासेमारांचे रक्षण करते ही समाजाची श्रध्दा आहे. या श्रध्देतून मंदिराची उभारणी कोळी समाजाने केली होती. मुंगादेवीच्या स्थानामुळेच मुंबई हे नाव या महानगरीला मिळाले आहे. मुंबईच्या सात बेटांवर असलेली मुंबादेवी, वाळकेश्‍वर, खारादेवी, मोतमाऊली ही कोळी समाजाचीच देवस्थाने असल्याचा दावा टपके यांनी केला आहे.

व्यवस्थापन कोळीबांधवांकडे द्यावे 

सरकारचे अभिनंदन ! मुंबईच्या विकासात या शहरातील खाड्या, खाजणजमिनींसह कोळी जमातीची मंदिरेदेखील अधिग्रहित झाली आहेत. आदिवासी कोळी जमातीच्या मागासलेपणाचा फायदा घेत परप्रांतीयांनी आमच्या मंदिराचा ताबा घेतला आहे. कोळी समाजाच्या श्रध्दा असलेल्या देवास्थानांचा हा एकप्रकारे अवमान आहे. सरकारने आता मंदिराचे व्यवस्थापन आमच्या हातात द्यावे, असे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी सांगितले.

 स्वतंत्र विश्‍वस्त मंडळ

नागपूर : प्रतिनिधी

मुंबादेवी मंदीरासाठी स्वतंत्र विश्‍वस्त मंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केली. या मंदिरावरील खाजगी ट्रस्टचे नियंत्रण काढून घेण्याची मागणी भाजपचे प्रतोद आमदार राज पुरोहित यांनी सातत्याने केली होती. मुंबादेवीच्या नावावरुन राजधानीला मुंबई हे नाव पडले. हे मंदिर मुंबईकरांचे श्रध्दास्थान तर आहेच पण देशभरातून येणारे पर्यटकही तेथे भेट देतात. मात्र या मंदिरावर खाजगी विश्‍वस्तांचा कब्जा आहे. मूळ कोळी समाजाची देवी समजल्या जाणार्‍या या देवस्थानातून कोळी समाजालाही प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही. बुधवारी पंढरपूर मंदिर सुधारणा विधेयकावरील चर्चेत भाग घेताना आ. राज पुरोहित यांनी या मंदिराचा मुद्दा उपस्थित करीत या मंदिरावरील खाजगी ट्रस्ट बरखास्त करुन सरकारचे नियंत्रण आणावे, स्थानिक लोकप्रतिनिधींनाही त्यामध्ये स्थान द्यावे, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे — पाटील व शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनीही त्यांना पाठींबा देत हे मंदिर सरकारच्या नियंत्रणात आणण्याची मागणी केली. अखेर मुख्यमंत्र्यांनी या मंदिरासाठीही स्वतंत्र विश्‍वस्त मंडळ स्थापन करण्याची ग्वाही दिली.