Mon, Apr 22, 2019 22:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विमान हायजॅकची अफवा पसरवणाऱ्याला दणका; 5 वर्षाची बंदी!

विमान हायजॅकची अफवा पसरवणाऱ्याला दणका; 5 वर्षाची बंदी!

Published On: May 20 2018 12:51PM | Last Updated: May 20 2018 12:51PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

विमान प्रवासासाठी धोकादायक ठरणाऱ्या व्यक्तींवर जबर बसवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘नो फ्लाई लिस्ट’मध्ये पहिल्या प्रवाशाची नोंद झाली आहे. ‘नो फ्लाई लिस्ट’ कायदा लागू झाल्याच्या आठ महिन्यानंतर एका प्रवाशाच्या विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. भारतातील हवाई प्रवासाच्या इतिहासात  एका प्रवाशावर बंदी घालण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे. या व्यक्तीचे नाव बिरजू किशोर सल्ला असून त्यांनी गेल्यावर्षी मुंबई-दिल्ली प्रवासादरम्यान विमान हायजॅक झाल्याची अफवा पसरवली होती. 

बिरजू हे मुंबईतील रहीवासी असून त्यांचा ज्वेलरचा व्यवसाय आहे. ३० ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी जेट एअरवेजच्या विमानाचे तिकीट काढले होते.या प्रवासादरम्यान त्यांनी टॉयलेटमध्ये विमान हायजॅक करण्यात आल्याचा खोटा मॅसेज लिहिला होता. हा मॅसेज पाहिल्यानंतर विमान अहमदाबादच्या विमानतळावर उतरवण्यात आले होते. पण, ही एक अफवा असल्याचे सिद्ध झाले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. बिरजू यांच्या आगाऊपणामुळे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी बिरजू यांच्यावर कारवाई करत पुढील ५ वर्षांसाठी त्यांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. 

नागरी विमान वाहतूकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेट एअरवेजने आम्हाला या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. ‘नो-फ्लाय-लिस्ट’ अंतर्गत  सुरक्षेच्या कारणास्तव बिरजू किशोर सल्ला यांच्या ५ वर्षांपर्यंतच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. ही बंदी नोव्हेंबर २०१७ पासून लागू करण्यात आली आहे. ‘नो-फ्लाय-लिस्ट’ मध्ये नाव आलेल्या व्यक्तीची माहिती इतर विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना देण्याची जबाबदारीही एअरलाइन्सची असेल. आम्ही अशा लोकांच्या नावाचा एक डेटाबेस तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘नो-फ्लाय-लिस्ट’ म्हणजे नक्की काय

विमान प्रवासात धोकादायक ठरणाऱ्या व्यक्तींवर या नियमांनुसार  बंदी घातली जाते. ही बंदी २ वर्षांपासून आजीवन अशी असू शकते. याशिवाय विमानात हिंसाचार, कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न किंवा विमान ऑपरेटींग सिस्टिचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यासही विमान प्रवासावर बंदी घातली जाऊ शकते. बिरजू यांनी केलेल्या चुकीची गंभीर दखल घेत त्यांना तिसऱ्या स्तराच्या यादीत(गंभीर चूक) टाकण्यात आले आहे.    

काय केले बिरजू यांनी 

बिरजू यांनी मुंबई ते दिल्लीच्या प्रवासादरम्यान टॉयलेटमध्ये धमकीचे पत्र ठेवले होते. यामध्ये ‘अपहरणकर्त्यांनी विमान हायजॅक केले असून त्यांनी विमानाला घेरले आहे. त्यामुळे विमान दिल्लीला उतरवायला नको. या विमानाला सरळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये न्यायला हवे, असे या पत्रात लिहिले होते. यानंतर कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवले होते.