Thu, Aug 22, 2019 12:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड होणार बंद!

1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड होणार बंद!

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी 

मुलुंडकरांचा वाढता विरोध, कोर्टाने विचारलेला जाब यामुळे मुंबई महापालिकेने 1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्याचा निर्णय घेतला. येथील सुमारे 600 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 558 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुलुंडसह भांडुप व ठाणे शहरातील नागरिकांची प्रदूषणापासून सुटका होणार आहे. 

मुंबई शहरातील देवनार, कांजूरमार्ग व मुलुंड डम्पिंगबंदीबाबत मुंबई पालिका कोणत्याही उपाययोजना हाती घेत नसल्यामुळे सव्वा वर्षापूर्वी कोर्टाने मुंबईत नवीन बांधकामांना बंदी घातली होती. पण नवीन प्रकल्प व उपाययोजनांची माहिती दिल्यानंतर कोर्टाने ही बंदी उठवली. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी निविदा मागवल्या असून, दररोज 600 मेट्रिक टन कचर्‍यापासून वीज निर्माण केली जाणार आहे. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सीला सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास पुढे आणखी दोन टप्प्यांत प्रत्येकी 600 मेट्रिक टन अशा एकूण 1800 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाईल. 

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी निविदा मंजूर झाली असून दररोज 600 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. कचर्‍यातील प्लास्टिक, लोखंड व इतर घटक वेगवेगळे काढले जाऊन बायोकल्चर पद्धतीने कचर्‍याचे विघटन केले जाणार आहे. कांजूर डम्पिंगमध्ये दररोज तीन हजार मेट्रिक टन कचर्‍यावर बायोरिअ‍ॅक्टर पद्धतीने प्रक्रिया केली जात असून खतनिर्मिती केली जात असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले. कचर्‍यावर नियंत्रण आणण्यासाठी दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्‍या गृहनिर्माण संस्था व हॉटेलना ओला व सुका कचरा वर्गीकरण प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 30 टक्के संस्थांनी प्रकल्प उभारले असल्याची माहितीही घनकचरा विभागाकडून देण्यात आली. मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करणार असल्याचे वचन शिवसेनेने दिले होते. त्यानुसार ही वचनपूर्ती करण्यात येत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.