Fri, Aug 23, 2019 21:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन पोलिसांना मारहाण

दोन पोलिसांना मारहाण

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:36AMमुलुंड :  प्रतिनिधी

 मुलुंड आणि नाहूर अशा दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. मुलुंडमध्ये तरुणींना त्रास देणार्‍या एका इसमाला हटकले म्हणून वाहतूक पोलिसालाच एका इसमाने मारहाण केली. तर नाहूरमध्ये तीन समाजकंटकांनी पोलिसावर हात उगारला. वाहतूक पोलीस विलास कांबळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलुंड पोलिसांनी गुरुवारी महेंद्र पोपट सकपाळे (60) राहणार कन्नमवार नगर विक्रोळी याच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्रला सायनच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून, गुरुवारी वाहतूक पोलीस कांबळी यांनी तक्रार दिली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या या इसमावर उपचार सुरु असल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हा इसम सर्वांना राज्यशासनाच्या व्हिजिलन्स विभागात काम करीत असल्याचे सांगत होता. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा इसम आरे डेरीतील निवृत्त कर्मचारी असल्याची माहिती पुढे आली आहे.   

नाहूरमधील म्हाडा वसाहतीत राहणारे श्रीकांत थोरात (28) या पोलीस कर्मचार्‍याला बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घरी जात असताना सुभाषनगर येथे असिफ शेख, राहुल भोसले, किशोर राऊत या समाजकंटकांनी अडविले आणि पैशाची मागणी केली. श्रीकांत यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता या तिघांनी त्यांना मारहाण  केली. यावेळी त्यांनी मी पोलीस कर्मचारी आहे, असे  सांगितले असता त्यांनी उलट आणखी मारहाण केली. झालेल्या प्रकाराची श्रीकांत यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत हे पोलीस आयुक्त कार्यालयात चालक म्हणून कर्तव्यावर आहेत.