Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दर उतरवले तरी मल्टिप्लेक्सचे खाद्यपदार्थ महागच!

दर उतरवले तरी मल्टिप्लेक्सचे खाद्यपदार्थ महागच!

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 2:18AMमुंबई : प्रतिनिधी 

राज्य सरकारच्या निर्णयानंतर मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर कमी झाले असले तरी ते अद्यापही सामान्यांसाठी प्रचंड महागच आहेत. दरम्यान, सरकारकडून खाद्यपदार्थांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दबाव आल्यास होणारा तोटा भरुन काढण्यासाठी  चित्रपटगृहांना तिकिटाचे दर 70 रुपयांनी वाढवावे लागण्याची शक्यता आहे.

मल्टिप्लेक्समध्ये विक्री केल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांच्या दरावरून प्रचंड प्रक्षोभ होता. अशा चित्रपटगृहांत घरातून आणलेले पदार्थ नेण्याची परवानगी द्यावी तसेच खाद्यपदार्थांचे दर कमी करावेत यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. त्यानंतर राज्य सरकारने खाद्यपदार्थांचे दर एमआरपी इतके ठेवण्याचे तसेच बाहेरील पदार्थ नेण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले होते. 1 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. 

या निर्णयापूर्वी सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांत समोसे 100 रुपयांना मिळत होते ते आता 80 रुपयांना मिळू लागले आहेत. पॉपकॉर्नचा दरही 100 वरून 80 रुपयांवर आला आहे. शीतपेयांची किंमतही 100 वरून 80 वर आली आहे. मल्टिप्लेक्समध्ये हे दर वेगळे आहेत.  अजूनही दराबाबतचे प्रकरण न्यायालयामध्ये आहे.भविष्यात कायदा झाल्यानंतर सर्वांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. 

नफा घटणार असल्याचा दावा

मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अशा चित्रपटगृहांत जाणार्‍या 50 टक्के लोकांनी बाहेरील पदार्थ नेण्यास सुरुवात केली, तर महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृह व्यवसायाचा नफा 100 कोटी रुपयांनी कमी होईल, असा अंदाज क्रिसिल या रेटींग एजन्सीने व्यक्‍त केला आहे.