Sat, Sep 22, 2018 19:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिलायन्स जिओ घेणार आरकॉमचे टॉवर, केबल

मुकेश अंबानींकडून बंधु अनिल यांना 23 हजार कोटींचा 'आधार'

Published On: Dec 29 2017 11:47AM | Last Updated: Dec 29 2017 12:49PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) या कंपनीच्या विशिष्ट मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी कराराची घोषणा, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीने केली आहे. आरकॉमच्या धनकोंनी मालमत्तांची विक्री करुन निधी उभारणी सक्तीची केली असून, या प्रक्रियेसाठी एसबीआय कॅपिटल मार्केटस लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. उद्योगजगतातील तज्ज्ञांचा एक स्वतंत्र ग्रूप या प्रक्रियेवर निगराणी करीत आहे. दोन टप्प्यात चालणार्‍या या प्रक्रियेसाठी रिलायन्स जिओ यशस्वी बोलीदार ठरली आहे.

करारानुसार रिलायन्स जिओ किंवा तिने नामनिर्देशित आस्थापना २३ हजार कोटी रुपयांना आरकॉमच्या चार प्रकारांतील मालमत्ता ताब्यात घेणार आहेत. यात टॉवर्स, ऑप्टीक फायबर केबलचे जाळे, स्पेक्ट्रम आणि मीडिया कन्व्हर्जन्स नोड यांचा समावेश आहे. रिलायन्स जिओच्या कार्यान्वयनासाठी या मालमत्ता खूपच उपयुक्त ठरणार आहेत.

ही प्रक्रिया सरकार तसेच नियामक यंत्रणा यांची परवानगी, धनकोंची संमती, इतर भारांची अदायगी यांना अधीन राहणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा मोबदला जिओला द्यावा लागणार आहे. दोन्ही पक्षांवर काही बंधने असून, यापुढील घोषणा योग्यवेळीच केली जाणार आहे.

प्रक्रियेच्या दरम्यान रिलायन्स जिओला गोल्डमन सॅक्स, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स, जेएम फायनान्शिअल प्रायव्हेट लिमिटेड, डेव्हिस पोक अँड वॉर्डवेल एलएलपी, सिरील अमरचंद मंगलदास, खेतान अँड कंपनी आणि अर्नस्ट अँड यंग यांच्याकडून सल्ला दिला जात आहे.

रिलायन्स जिओ ही मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असून, स्थापनेपासून वर्षभरात जिओने दूरसंचार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. मोफत कॉलिंग, एसएमएस, अमर्याद डाटा अशा विविध सेवा देऊन कंपनीने आपले करोडो ग्राहक निर्माण केले आहेत.