Fri, Jul 19, 2019 05:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील सहकारी सस्थांची काढणार श्‍वेतपत्रिका

राज्यातील सहकारी सस्थांची काढणार श्‍वेतपत्रिका

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 1:02AMमुंबई : चंदन शिरवाळे

जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवून काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांना साडेतीन वर्षांपासून वेसण लावलेल्या भाजपा सरकारने आता राज्यातील सहकार संस्थांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सहकार विभागाने सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या, कृषी प्रक्रिया उद्योग, यंत्रमाग, जिल्हा बँकांसह कृषी उत्पन्न बाजार समित्यांची श्‍वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले आहे.

सहकार चळवळीच्या माध्यमातून काँग्रेसने राज्याच्या विकास केला आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध केला असताना राज्यात सत्तेवर आल्यापासून भाजप सरकारने सहकार चळवळ मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते करत आहे.

विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात हाच मुद्दा उपस्थित करत विरोधकांकडून सरकारची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आरोपांमुळे सत्ताधार्‍यांकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे आपल्यावरील संशय झटकण्यासाठी आता सहकार विभागाने पावले टाकली आहेत. राज्य सरकार अनुदान देत असलेल्या सर्व सहकारी संस्थांची श्‍वेतपत्रिका काढण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे काम सुरू असून आतापर्यंत 25 टक्के काम झाले आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी श्‍वेतपत्रिका आणली जाईल, अशी माहिती सहकार, वस्त्रोद्योग व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. अनेक संस्था बंद पडल्या आहेत, तर काही संस्था आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आल्या आहेत. सध्या भाजपा सत्तेवर असल्यामुळे या संस्था मोडकळीस येण्यास सत्ताधार्‍यांना जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे सत्यस्थिती जनतेसमोर येण्यासाठी सहकारी संस्थांची श्‍वेतपत्रिका काढण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.