Tue, Apr 23, 2019 00:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटीचे अकराशे संपकरी जाणार घरी

एसटीचे अकराशे संपकरी जाणार घरी

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:58AMमुंबई ः चंदन शिरवाळे

8 व 9 जून रोजीच्या संपात दगडफेक करून एस.टी. बसेसचे नुकसान करणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे 1100 नवीन कर्मचार्‍यांची सेवा खंडित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये चालक, वाहक, यांत्रिकी व लेखनीकांचा समावेश आहे. तसेच या संपाची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचार्‍यांना चिथावणी देणार्‍यांचा एस.टी.च्या सुरक्षा व दक्षता विभागाने  शोध सुरू केला आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे आतापर्यंत पाच वेळा करार झाले आहेत. 1996 मध्ये 288 कोटी, 2000 व 2004 मध्ये करार झाले नाहीत. 2008 मध्ये 1920 कोटी रुपये तर 2012 मध्ये 1920 कोटी रुपयांचा वेतन करार झाला होता. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 2016-2020 या चार वर्षांसाठी  सुमारे 4849 कोटी रुपयांची वाढ जाहीर केली होती. तसेच मान्यताप्राप्त संघटनेने पुढे आल्यास वेतनकरार करण्याचीही त्यांनी तयारी दर्शविली होती. मात्र, ही वाढ मान्य नसल्याचे सांगत एस.टी. कर्मचार्‍यांनी 8 व 9 जून रोजी संप पुकारला. 

अनेक वर्षांची सेवा झालेले बहुतांश कर्मचारी संपकाळात आगारांकडे फिरकले नाहीत. मात्र, नुकतेच भरती झालेले कर्मचारी या संपात अग्रेसर होते. आगारातून बाहेर पडणार्‍या बसेसवर त्यांनी दगडफेक केल्यामुळे काचा फुटल्याने महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. एसटीत गेल्या काही महिन्यांमध्ये 9 हजार कामगारांची भरती झाली आहे. त्यांचे अद्याप 180 दिवसही पूर्ण भरलेले नाहीत, अशा 1100 कर्मचार्‍यांना प्रशासन ब्रेक देणार असल्याची एस.टी.त चर्चा आहे.

एस.टी. चे कर्मचारी क्षुल्लक कारणांवरूनही संप करून प्रशासनाची कोंडी करतात.  2015 अखेर व 2017 च्या दिवाळीपूर्वी कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे वांरवार होणार्‍या संपामुळे कर्मचारी बसेसला टार्गेट करतात. यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होते. यावर प्रभावी उपाय म्हणून कर्मचार्‍यांची सेवा खंडित करण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. याबाबत परिवहन मंत्री रावते यांना माहिती दिल्याचे समजते.