Sun, Aug 18, 2019 15:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राखी बांधून घेऊन लेखी आश्‍वासनाची ओवाळणी द्या

राखी बांधून घेऊन लेखी आश्‍वासनाची ओवाळणी द्या

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या भगिनींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राखी बांधून घ्यावी व ओवाळणी म्हणून मराठा समाजाच्या मागण्यांबाबतचे लेखी आश्‍वासन द्यावे, अशी मागणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या  वैशाली जाधव यांनी केली. आंदोलनाच्या  तिसर्‍या दिवशी महिलांनी मनातली खदखद व्यक्त करीत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील विविध भागातून आलेल्या मराठा आंदोलकांनी सरकारच्या विरोधात आरक्षणाच्या मुद्द्यावरून शनिवारी आक्रोश व्यक्त केला. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील संघटना, संस्था व मराठा बांधव यांनी आंदोलनास शनिवारी भेट दिली. तसेच रविवारी पश्‍चिम महाराष्ट्रातून येणारे  युवक आझाद मैदान येथे आंदोलनकर्त्या महिलांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील सैदापूर येथील वैशाली जाधव म्हणाल्या की, मराठ्यांच्या मागण्या आता सरकारला तोंडपाठ झाल्या आहेत. प्रमुख  बावीस मागण्या पूर्ण करण्यास सरकारने प्राधान्य घ्यावे. बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. 26 वर्षांपासून चालेल्या आरक्षणाच्या लढ्याला आता व्यापक स्वरूप आले आहे. कराडच्या स्वाती पिसाळ यांनी  कोणत्याही मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचे फक्त लेखी आश्‍वासन देण्यात काय गैर आहे? असा सवाल उपस्थित केला. 

सांगलीच्या जयश्री सपकाळ यांनी तीन दिवस आंदोलन करूनही अद्याप कोणत्याही मराठा आमदार अथवा खासदारांनी भेट दिली नाही. नेते आंदोलनाला भेट देऊ शकत नसतील तर मराठ्यांचे संरक्षण काय करणार? असा सवाल केला. यावरून राजकारण्यांची भूमिका स्पष्ट समजत आहे. आतापर्यंत शांततेत निघालेले मोर्चे आक्रमक झाले आहेत. याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. मराठ्यांवर आंदोलनावेळी गुन्हे दाखल करण्याचे कारण सुद्धा सरकारनेच स्पष्ट करावे, असे आवाहन केले. 

अशा प्रकारचे तरुणांवर गुन्हे दाखल करून मराठ्यांना भरकटवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी आंदोलकांची शनिवारी भेट घेतली. मागण्यांचे निवेदन पुढे पोहोच करण्याची जबाबदारी पार पाडण्याचे आश्‍वासन दिले.