Fri, May 24, 2019 07:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उंदराने कुरतडलेले वडा-पाव रेल्वे प्रवाशांच्या पोटात (व्हिडिओ)

उंदराने कुरतडलेले वडा-पाव रेल्वे प्रवाशांच्या पोटात (व्हिडिओ)

Published On: May 05 2018 9:13PM | Last Updated: May 05 2018 9:13PM डोंबिवली : वार्ताहर

रेल्वे प्लेटफॉर्मवर विकण्यात येणारे खाद्य पदार्थ निकृष्ठ दर्जाचे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. कल्याणमध्येही अशीच धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेचा पूर्ण प्रकार एका प्रवाश्याने मोबाईलमध्ये कैद केला आहे. या व्हिडीयोमध्ये उंदराने कुरतडलेले वडा-पाव प्रवाशांच्या पोटात उतरवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्या पाठोपाठ ट्रेनमध्ये विकण्यात येणाऱ्या वडा-पाववर उंदीर ताव मारत असल्याचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असल्याने ट्रेनमध्ये विकण्यात येणाऱ्या या खाद्य पदार्थांच्या दर्जा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

 रेल्वे स्थानकांवर विकण्यात येणाऱ्या पाण्याच्या बाटल्या थंड करण्यासाठी वापरण्यात येणार बर्फ हा टॉईलेटमध्ये ठेवल्याचे तसेच चहासाठीही टॉईलेटचाच वापर करत असल्याचा प्रसिद्धी माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर प्रवाश्यांच्या आरोग्याशी किती खेळतात याचे जिवंत उदाहरण समोर उभे राहिले असतानाच कल्याणमध्येही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. आपण जर रेल्वेने प्रवास करीत असताना वडा-पाव खाण्याची इच्छा झाली तर जरा जपून, कारण एक धक्कादायक किळसवाणा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच रेल्वे स्थानकात वडा-पाव घेतना विचार करून आपले आरोग्य जपाल, काही दिवसापूर्वीच एका एक्सप्रेसमधील शौचालयातील पाण्याचा वापर रेल्वेत चहा विकणाऱ्या एक चहा विक्रेता करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ आता कल्याण रेल्वे स्थानकात एका वडा-पाव विक्रेत्याच्या टोकऱ्यात घुसून उंदीर, घुशीने ताव मारल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात दिवसागणिक लाखो प्रवाशी रेल्वे, लोकलने प्रवास करीत असतात. अशातच लाब पाल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवाश करणारे प्रवाशी मुंबईकरांचे आवडते खाद्य म्हणून वडा-पाव घेतात. मात्र वडा-पाव विक्रेते वडापाव बनविण्यासाठी लागणारे साहित्य कशे वापरता. हे आपण न पाहताच वडापाव खातो. हे वडे कुठल्या तेलात तळतात. कुठल्या बेकरी मधून पाव आणतात. याकडेही रेल्वेचे संबधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अश्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.  

रेल्वे मध्ये व प्लेटफॉर्मवर विकण्यात येणारे खाद्य पदार्थ नेहमीच चुकीचे तसेच नित्कृष्ट दर्जाच्या विळख्यात असतात याबाबत प्रवासी वर्गातून तक्रारीचा ढीग साचतो. मात्र रेल्वे प्रशासानाकडून प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कारवाई न करता जणू पाठीशी घालण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येते. त्यातच आता ट्रेनमध्ये विकल्या जाणाऱ्या वडा-पावबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ट्रेन येण्यास वेळ असल्याने एका विक्रेत्याने हे वडा-पाव कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लेटफॉर्मवर ठेवले आणि आपल्या कामानिमित्त निघून गेला. मात्र ठेवलेल्या या वडापाववर उंदरानी चांगलाच ताव मारला. त्यानंतर विक्रेता परत आल्यानंतर सदर बाब प्रवाशांनी विक्रेत्याच्या नजरेस आणून दिली. मात्र विक्रेत्याने त्या वडा-पावचा ट्रेमध्ये घुसलेल्या उंदराला बाहेर काढले व काही न झाल्याच्या अविर्भावात काही पाव बाहेर फेकले आणि याकडे दुर्लक्ष करत उंदराने कुरतडलेले वडा-पाव घेवून पुन्हा विक्री करण्यास निघून गेला. हा सर्व किळसवाना प्रकार विशाल वाघचोरे या तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान या घटनेमुळे रेल्वेमध्ये विकण्यात येणारे खाद्य पदार्थ प्रवाशांच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. हे जगजाहीर झाले असून प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.