Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोटरमनच्या टंचाईमुळे लोकलच्या अनेक फेर्‍या रद्द!

मोटरमनच्या टंचाईमुळे लोकलच्या अनेक फेर्‍या रद्द!

Published On: Jun 01 2018 1:37AM | Last Updated: Jun 01 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी

मागील आठवड्यात मध्य रेल्वेने प्रवास करणार्‍या चाकरमान्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ऐन गर्दीच्याच वेळी रेल्वेच्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आल्याने येणार्‍या पुढील लोकलमध्ये चाकरमान्यांना मेंढरांप्रमाणे प्रवास करावा लागला. या फेर्‍या रद्द झाल्यानंतर अनेकदा तांत्रिक बिघाडाचे ठरललेले कारण प्रवाशांना सांगितले जाते. मात्र तांत्रिक बिघाड हे लोकलच्या फेर्‍या रद्द होण्याचे कारण हे नसून, मोटरमनची कमतरता असल्याने दररोज अनेक लोकलच्या फेर्‍या रद्द केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य रेल्वेवर मागील पाच दिवसात ऐन गर्दीच्या काळात जवळपास 40 लोकल या रद्द करण्यात आल्या आणि यामागे तांत्रिक बिघाडाचे कारण देण्यात आले. मात्र खरे कारण वेगळच आहे. मध्य रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या विभागातील मोटरमनच्या पदासाठी उपलब्ध असलेल्या जागांपैकी 20 टक्के जागा या खाली आहेत. तसेच लोकल 898 मोटरमनची गरज असताना सध्या फक्त 690 मोटरमन कार्यरत आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक संजय कुमार जैन यांना लोकलसेवा रद्द होण्यामागे मोटरमनची कमी असल्याचे विचारले असता त्यांनी हे वृत्त नाकारले आहे. मात्र मोटरमनच्या कमतरतेमुळे 27 मे रोजी मेन लाईनवरील 10 तर हार्बर लाईनवरील 14 लोकल फेर्‍या या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच याच कारणांमुळे 25 मे रोजी देखील 10 फेर्‍या, 26 मे रोजी 2 फेर्‍या, 28 मे रोजी 5 फेर्‍या आणि 29 मे रोजी 3 फेर्‍या या रद्द करण्यात आल्या.

नेमक्या गर्दीच्या वेळी लोकलच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळेच अशावेळी एखादी लोकल रद्द झाली की नंतर येणार्‍या लोकलमध्ये जवळपास 2000 प्रवाशांची जास्त गर्दी होते. तसेच 2000 प्रवाशांना नेण्याची क्षमता असलेल्या लोकलमधून तब्बल 5000 हून अधिक प्रवाशांना प्रवास करावा लागतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत कोंबले गेल्याने गाडीतून पडून मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्याही वाढीस लागली आहे. 2017 मध्ये गर्दीमुळे लोकलमधून पडून जवळपास 654 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहेत तर 1,434 प्रवासी जखमी झाले आहेत.

उन्हाळ्यात अनेक मोटरमन हे सुट्टीवर जात असतात. तसेच जे मोटरमन काम करत असतात ते ओव्हरटाईम करण्यास नकार देतात. त्यामुळेच मोटरमनच्या कमतरतेमुळेच अनेकदा लोकल फेर्‍या रद्द केल्या जात असल्याची माहिती एका मोटरमनने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. जैन यांनी या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करून फेर्‍या वाढवण्याच्या दृष्टीने अनेक उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच गेल्या वर्षभरात 72 फेर्‍या वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.