Fri, Aug 23, 2019 14:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहनचोरी, सोनसाखळी, दरोडा कक्ष गुंडाळले!

वाहनचोरी, सोनसाखळी, दरोडा कक्ष गुंडाळले!

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 1:07AM

बुकमार्क करा
मुंबई : अवधूत खराडे

समाजसेवा शाखेतील तब्बल 17 अमंलदारांच्या तडकाफडकी बदली आदेश काढून दणका दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या प्रमुखांनी मोटार वाहन चोरी, सोनसाखळी चोरी आणि जबरी चोरी व दरोडा विरोधी कक्षांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. हे तिन्ही स्वतंत्र कक्ष बंद करण्यात आले असून या कक्षाच्या कारभार्‍यांना मालमत्ता कक्षात हलवण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. हा बदल करताना मालमत्ता कक्षातील एका अधिकार्‍यासह तीन अंमलदारांची तडकाफडकी बदलीचे आदेश काढण्यात आल्याने गुन्हेशाखेत खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेमध्ये विशेष कक्षांची आवश्यकता काय अशा गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या विचारातून हे कक्ष बंद करण्याचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आला होता. याचे वृत्त दै. पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर थंडावलेली ही कारवाई समाजसेवा शाखेचे पंख छाटून चर्चेत आली होती. समाजसेवा शाखेवर कारवाई करुन महिना होत नाही तोच, गुन्हे शाखेच्या अर्तंगत येणार्‍या मोटार वाहन चोरी कक्ष, सोनसाखळी चोरी कक्ष आणि जबरी चोरी व दरोडा कक्षांवर कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हे उकलींचा आकडा घटला, तसेच स्थानिक स्तरावर गुन्हे शाखेचे 12 कक्ष कार्यरत असून ते सुद्धा या गुन्ह्यांची उकल करु शकतात. अशा निकषांवर हे स्वतंत्र कक्ष बंद करुन या अधिकारी अंमदरांना मालमत्ता शाखेत सामावून घेत, या शाखेच्या अर्तंगर्त गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश काढण्यात आलेअसल्याची माहिती मिळते. तिन्ही कक्षांवर कारवाई करण्यात आली असताना याचा फटका मालमत्ता कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकार्‍यासह तीन अंमलदारांना बसला असून त्यांच्याही तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखेमध्ये करण्यात आलेल्या या बदलांनतर कार्यरत असलेल्या 12 कक्षांमधील अधिकारी आणि अंमलदारांमध्ये खळबळ उडाली असून आपल्यावरही कारवाई होणार का अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.