Tue, Nov 13, 2018 23:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आईला मारहाण करणार्‍या भावाचा खून 

आईला मारहाण करणार्‍या भावाचा खून 

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 12:50AMडोंबिवली : वार्ताहर

दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करत मारहाण करणार्‍या मोठ्या भावाची संतापलेल्या लहान भावानेच धारदार चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलनी साईसृष्टी कृपा बिल्डींगमध्ये घडली आहे. नागेश लष्कर (26) असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी लहान भाऊ सूरज लष्कर (19) याला अटक केली आहे. 

साईसृष्टी कृपा बिल्डींगमध्ये कुसुम लष्कर (48) या दोन मुले नागेश व सूरजसोबत राहतात. नागेश याला दारुचे व्यसन जडले होते. तो रोज दारू ढोसून घरी यायचा व क्षुल्लक कारणावरून आई व सूरज याला शिवीगाळ, मारहाण करायचा. यातून घरात दोघा भावांमध्ये अनेकदा वाद झाले होते. रविवारी बारा वाजण्याच्या सुमारास नागेश हा दारूच्या नशेत घरी आला. घरी येताच त्याचा सूरजसोबत वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या सूरजने कपाटातून धारदार चाकू काढून नागेशच्या छाती, पोट आणि पाठीवर सपासप वार केले. 

या हल्ल्यात नागेश हा घरातच जमिनीवर कोसळून रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर नातेवाईक व शेजार्‍यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी नागेशला मृत घोषित केले. दरम्यान, अटक केलेल्या सूरजला सोमवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक झेंडे करीत आहेत.