Mon, Jul 15, 2019 23:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडिलांसोबत अनैतिक संबंधाचा संशय; आईकडून मुलीची हत्या!

वडिलांसोबत अनैतिक संबंधाचा संशय; आईकडून मुलीची हत्या!

Published On: Mar 24 2018 10:44AM | Last Updated: Mar 24 2018 10:43AMबेलापूर : वार्ताहर

खारघरमध्ये राहणार्‍या संतोषीदेवी सयानी या महिलेने 16 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीचे तिच्या वडिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संतोषीदेवी हिला संशय होता. त्यामुळे तिने मुलीची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खारघर पोलिसांनी संतोषीदेवीला बुधवारी अटक केली.

मृत मुलगी ही आई-वडील व लहान भावासह खारघर सेक्टर 29 मध्ये राहत होती. दहावीत असलेल्या या मुलीचे वडिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय तिच्या आईला होता. यावरून ती नेहमी मुलीला मारहाण करत असे. ही बाब त्या मुलीने वर्गमैत्रिणीला सांगितली होती. या छळाला कंटाळून काही दिवसांपूर्वी तिने इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ती चिठ्ठी सुरक्षारक्षकाकडे दिली होती. सुरक्षारक्षकाने ही चिठ्ठी त्या मुलीच्या वडिलांऐवजी तिच्या लहान भावाकडे दिली. ती संतोषीदेवीच्या हातात पडल्यामुळे मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता.

मुलीची दहावीची परीक्षा सुरू असतानाच 4 मार्च रोजी संतोषीदेवी हिने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मुलीने आत्महत्या केल्याची आवई उठवून आईने पोलिसांचीही दिशाभूल केली. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात तिचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या मैत्रिणीकडे विचारपूस केल्यानंतर तिने तिची आई छळ करत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी संतोषीदेवीला ताब्यात घेऊनचौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली.

Tags : Mother, Daughter, Sexual Affair