होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जुळ्यांना जन्म दिल्यानंतर दीड वर्षांनी तिने उघडले डोळे

जुळ्यांना जन्म दिल्यानंतर दीड वर्षांनी तिने उघडले डोळे

Published On: Apr 08 2018 9:34AM | Last Updated: Apr 08 2018 10:30AMमुंबई : प्रतिनिधी

मुलाला जन्म देणे म्हणजेच प्रत्येक आईसाठी दुसरा जन्म असतो. मुलुंडची रहिवाशी असणार्‍या 36 वर्षीय भावेशा नावाच्या महिलेचा प्रसूती दरम्यान रक्तदाब कमी झाल्याने ती कोमात गेली. मात्र मुंबईतील जसलोक रुग्णालयाने जीवदान देत तिच्यात जगण्याची नवी आशा निर्माण केली आहे. डॉक्टरांनी भावेशावर नुकतीच डिप ब्रेन स्टिम्युलेशनची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर भावेशाने तब्बल दीड वर्षानंतर डोळे उघडले आहेत.

भावेशा अजूनही पूर्णपणे कोमातून बाहेर आलेली नाही. ती हालचालही करू शकत नाही. पण, गुरूवारी शस्त्रक्रियेनंतर भावेशाने पहिल्यांदाच डोळे उघडले. ज्यामुळे तिच्यात जगण्याची नवी आशा दिसून आल्याचे जसलोक रुग्णालयातील डॉक्टर आणि तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

जसलोक रूग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट विभागाचे प्रमुख डॉ. परेश दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेशाला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर तिला मुलुंडच्या एका खासगी मॅटर्निटी होममध्ये दाखल करण्यात आले. पण, प्रसूती दरम्यान भावेशाचा रक्तदाब कमी झाला. त्यातही तिने दोन बाळांना सुखरूप जन्म दिला.

प्रसूती दरम्यान तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तेव्हाच ती कोमात गेली. मॅटर्निटी होममध्ये उपकरणे नसल्याने तिला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर जवळपास महिनाभर उपचार करण्यात आले. मात्र तिथेही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

काही कालावधीनंतर पुन्हा एकदा तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेत जसलोक रुग्णालयाशी संपर्क साधला. सल्लामसलत करुन डॉक्टर आणि कुटुंबीयांच्या सहकार्याने तिच्यावर डिप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेआधीच तिने न्यूरोफिजिओलॉजिकल टेस्टला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्यानंतर 3 एप्रिलला तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

तब्बल 18 महिन्यांनी भावेशाला शुद्ध आली आहे. तिने डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तिने हळूहळू डोळे उघडले आहेत. पूर्णपणे कोमातून बाहेर येण्यासाठी तिला आणखी काही आठवडे कदाचित दोन-तीन महिने लागतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Tags : hospital, Mother, Child, Coma, Deep Brain Stimulation