Wed, Nov 14, 2018 12:11



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माथाडी कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य

माथाडी कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





नवी मुंबई : प्रतिनिधी

माथाडी कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असून, 3 एप्रिल रोजी मंत्रालयात होणार्‍या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे आश्‍वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी दिले. विविध मागण्यांसाठी मस्जिद बंदर येथे काढण्यात आलेल्या मोर्चाला सामोरे जाताना तावडे यांनी मागण्या आदल्या दिवशीच मान्य केल्याचे जाहीर केले. त्यानंतर या मोर्चाचे विजय मेळाव्यात रूपांतर झाले. 

पुढील वर्षी माथाडी कायद्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने राज्य सरकारने सुवर्ण महोत्सव साजरा करावा, अशी मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे, असे तावडे म्हणाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी निधी दिलेला आहे. आणखी 500 कोटी देण्यात येतील, तसेच लवकरच या महामंडळावर अध्यक्षाची नेमणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

माथाडी व सुरक्षारक्षक कामगार बचाव कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबा आढाव यावेळी म्हणाले की,  चळवळीत सध्या उंदरांचा सुळसुळाट फार झाला आहे, त्यांचा बिमोड करण्यासाठी आपण सर्व कामगारांनी सतत जागरूक राहिले पाहिजे. मी 50 वर्षे वेगवेगळ्या पक्षांची राजवट पाहत आहे अनेक सरकार येतात व जातात, पण कामगारांच्या मागण्या क्वचितच मान्य होतात. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री व कामगारमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मागण्यासंबंधी निर्णायक लेखी आश्वासन घेण्याचा प्रयत्न केला.

या विजयी मेळाव्यास कामगार नेते अविनाश रामिष्टे,बळवंतराव पवार,राजकुमार घायाळ,पोपटराव पाटील,जयवंतराव पिसाळ,तानाजी कदम,नंदाताई भोसले, हणमंतराव सुरवसे, अर्जुनराव दिवाळे,रवींद्र जाधव, हरीश धुरट, विकास मगदूम,सुभाष लोमटे,आप्पा खताळ,सतीशराव जाधव,शिवाजी सुर्वे,लक्ष्मणराव भोसले आदी नेते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातून हजारो माथाडी व सुरक्षारक्षक कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य,माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले, तर संघटनेचे जनसंपर्क अधिकारी व सेक्रेटरी पोपटराव देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

संपूर्ण महाराष्ट्रात माथाडी कामगारांची संख्या 45 हजारांच्या घरात आहे. या सर्व कामगारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. त्यांच्या प्रलंबित असलेल्या बहुतांशी मागण्या मार्गी लागणार आहेत.






  •