होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक कर्जमाफी

राज्यात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक कर्जमाफी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


मुंबई : चंदन शिरवाळे

राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यासाठी सर्वाधिक म्हणजे 2 हजार 554 कोटी 36 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल अहमदनगर 2335 कोटी, पुणे 2166 कोटी, जळगाव 1751, बुलढाणा 1469 कोटी तर बीडसाठी 1293 कोटी रुपयांची तरतूद आहे. बुधवारअखेर राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये सुमारे 3 हजार 500 कोटी रुपये जमा झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्यांपूर्वी राज्यातील शेतकर्‍यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली होती. सुमारे 38 हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमुक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले होते. सरकारी पगारदार व  लोकप्रतिनिधींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. आतापर्यंत 71 लाख शेतकर्‍यांचे ऑनलाईन अर्ज आले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 18 ऑक्टोबरला शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचे  प्रमाणपत्र दिले आहे. त्यामधील काहींच्या बँकखात्यामध्ये रक्कम जमा झाली नसली, तरी याबाबतची प्रक्रिया आता जोरात सुरु असल्याची माहिती सहकार विभागातील अधिकार्‍याने दिली. 

पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आवश्यकता पडल्यास पुरवणी मागण्यांद्वारे आणखी रक्कम देण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. विदर्भ व मराठवाड्यामधील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकर्‍यांसाठी आघाडी सरकारने 286 कोटी रुपयांचे वाटप केले होते. तर कर्जमाफीसाठी पाच एकरची अट निश्‍चित केली होती. याउलट भाजपा सरकारने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी 6 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच एकरची अटही रद्द केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने केवळ 6 जिल्ह्यांना जवळपास 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले होते. तर विद्यमान सरकारने समन्वयी वाटपाचे तत्व पाळले आहे. प्रत्येक जिल्ह्याला सरासरी 1 हजार कोटी रुपये मिळतील,असा दावा अधिकार्‍याने केला आहे.