Fri, Mar 22, 2019 01:31
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शवविच्छेदनाचा ताण कर्मचार्‍यांसाठी जीवघेणा

शवविच्छेदनाचा ताण कर्मचार्‍यांसाठी जीवघेणा

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 1:13AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

जगण्यासाठी पैसा लागतो म्हणून कुटुंबाच्या चरितार्थासाठी नोकरीचा मार्ग  स्वीकारला जातो. दुनियेच्या दृष्टीने कठीण काम असलेल्या  शवविच्छेदन केंद्रात हाडामांसाची जिवंत माणसे अहोरात्र काम करत असतात; परंतु अपुर्‍या सोयींमुळे  मुंबईतल्या विविध शवविच्छेदन केंद्रांत काम करणार्‍या 25 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांना सेवेत असतानाच  विविध आजाराने मृत्युमुखी पडावे लागले अशी धक्कादायक माहिती समोर आली. राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या या शवविच्छेदन केंद्राच्या सोयीसुविधा व तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने दिले गेले नाही तर सध्या काम करत असलेल्या व्यक्तीच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईसारख्या कोट्यवधीची लोकसंख्या असलेल्या शहरात दररोज  मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. श्रीमंताच्या दिमतीला असलेली खासगी पंचतारांकित रुग्णालये असोत, नाहीतर सरकारी अथवा महापालिकेची रुग्णालये असू दे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचे कारण कळत नसेल तर तो  मृतदेह शवविच्छेदन केंद्रात नेला जातो. राज्य सरकारच्या गृह खात्याच्या अखत्यारित विविध रुग्णालयांत असलेली ही  शवविच्छेदन केंद्रे येतात.   शासनाच्या निर्णयानुसार 1999 साली कॉरोनर कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे मुंबईतील आत्महत्या, अपघाती मृत्यूसह अनैसर्गिक मृत्यूच्या शवविच्छेदनाचे काम कॉरोनरऐवजी फौजदारी व्यवहारसंहिता 1973 च्या कलम 174, 175 व 176 अनुसार पोलिसांच्या अखत्यारीत पोलीस शल्यविशारदांच्या (सर्जन) माध्यमातून करण्यात येऊ लागले. या व्यवस्थेनुसार कोणताही मृतदेह पाच दिवसांपेक्षा जास्त काळ पडून असल्यास त्यावर अंत्यसंस्कार करणे बंधनकारक करण्यात आले असून 24 तासांत शवविच्छेदन अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे.  मात्र,मुंबईसारख्या शहरात असलेल्या एकूण  शवविच्छेदन केंद्राची स्थिती पाहली तर त्या ठिकाणी राज्य सरकारने  अधिक सोयीसुविधा देण्याची गरज आहे असे चित्र पाहावयास मिळेल.       

शवविच्छेदन  केंद्रात डॉक्टर, सहायक  तंत्रज्ञ सहायक, सेवक सफाई कामगार अशी पदे असतात  शवविच्छेदन केंद्रात असलेले जास्त मृतदेह त्याठिकाणी येत असल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे कमी मनुष्यबळ असताना सध्या काम करत असलेल्या व्यक्तींना कामे करावी लागतात. एखाद्या मॉलमध्ये स्वच्छता राहावी यासाठी सफाई कर्मचारी सातत्याने कार्यरत असताना दिसतो, पण शवविच्छेदन केंद्रात संसर्ग होण्याची अधिक शक्यता असल्याने याठिकाणीची खोली निर्जंतुकीकरण करून स्वच्छता ठेवणे  आवश्यक असते; परंतु तशी काळजी घेतल्याचे दिसून येत नाही.  दर तीन महिन्यांनी प्रत्येक कर्मचार्‍याची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे त्याना अंडी, दूध असा पोषक आहार द्यायला हवा असे सांगण्यात आले. आपल्या सोयीसुविधेसाठी मागणी केली म्हणून यापूर्वी काही कर्मचार्‍यांना वेगळ्या कारणावरून निलंबित केले. त्यामुळे याठिकाणी कोणी कर्मचारी बोलायला तयार नसल्याचे दिसून आले. ‘शवविच्छेदन कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी तसेच रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत यासाठी गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांना पत्र पाठवून पाठपुरावा केला जात  आहे. सरकारने या प्रश्नाकडे मानवतेच्या दृष्टीने पाहावे,’ अशी प्रतिक्रिया  राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिली.