Fri, Jul 03, 2020 00:11



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चाळीस लाखांहून अधिक प्रवासी मजूर पोहोचले स्वगृही; धावल्या ३ हजार ६० विशेष श्रमिक ट्रेन

चाळीस लाखांहून अधिक प्रवासी मजूर पोहोचले स्वगृही; धावल्या ३ हजार ६० विशेष श्रमिक ट्रेन

Last Updated: May 26 2020 4:38PM

file photo



नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे विविध राज्यात प्रवासी मजुरांसह तीर्थयात्री, ​पर्यटक, विद्यार्थी तसेच इतर लाखो नागरीक अडकून पडले होते. या सर्वांना त्यांच्या शहरात पोहोचवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वे विभागाकडून १ मे पासून विशेष श्रमिक ट्रेन चालवण्यात येत आहेत. या ट्रेनमधून आतपर्यंत ४० लाखांहून अधिक श्रमिक स्वगृही परतले असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

सोमवारी (ता.२५) पर्यंत देशातील विविध राज्यातून एकूण ३ हजार ६० विशेष श्रमिक ट्रेन चालवण्यात आल्या. या ट्रेनमधून हे सर्व प्रवासी मजूर त्यांच्या घरी पोहोचले असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. ३ हजार ६० पैकी २ हजार ६०८ ट्रेन गंतव्य स्थानावर पोहोचल्या आहेत, तर ४५३ ट्रेन धावत आहेत. २४ मे ला सोडण्यात आलेल्या २३७ विशेष श्रमिक ट्रेनमधून ३.१ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
 
विविध राज्यातून हजारो विशेष श्रमिक ट्रेन आतापर्यंत सोडण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ट्रेन या गुजरात (८५३), महाराष्ट्र (५५०), पंजाब (३३३), उत्तपद्रेश (२२१) तसेच दिल्लीतून (१८१) सोडण्यात आल्या होत्या. गंतव्य स्थानावर पोहोचल्यानंतर या ट्रेन समाप्त करण्यात आल्या. पहिल्या पाच राज्यात उत्तरप्रदेश (१,२४५), बिहार (८४६), मध्य प्रदेश (११२) तसेच ओडिशात (७३) या विशेष ट्रेन पोहोचल्या.
 
तुरळक रेल्वे मार्गांवर २३ तसेच २४ मे ला प्रवाशांची बरीच गर्दी दिसून आली होती. या प्रवाशांनाही त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. बिहार तसेच उत्तर प्रदेशातील अनेक रेल्वे स्टेशनला आरोग्य प्रोटोकॉल संबंधीच्या परवानग्या उशिराने मिळाल्याने रेल्वेसाठी प्रवाशांनी गर्दी केल्याचे  दिसून आले होते. रेल्वेकडून यासंबंधी संबंधित राज्य सरकारसोबत चर्चा केल्यानंतर प्रवासासाठी संभावित मार्गाचा शोध घेत समस्येचे निराकरण करण्यात आल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

अडकलेल्या प्रवासी मजुरांची वाहतूक करण्यासाठी राज्यांकडून ज्या प्रकारे मागणी येईल त्यानुसार या विशेष श्रमिक ट्रेन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवासी मजुरांच्या वाहतुकीचा ८५ टक्के खर्च रेल्वे मंत्रालय वहन करीत असून उर्वरित खर्च संबंधित राज्य सरकारे करीत आहेत. रेल्वे मंत्रालयाने विशेष श्रमिक ट्रेन सह राजधानी नवी दिल्लीला जोडणाऱ्या १५ (अप/डाउन) विशेष ट्रेन चालवण्यात येत आहे. तसेच १ जून पासून २०० ट्रेन वेळापत्रकानूसार सुरु करण्याची विभागाची योजना असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.