Tue, Mar 26, 2019 22:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील ६१ हजारहून अधिक शाळा डिजिटल

राज्यातील ६१ हजारहून अधिक शाळा डिजिटल

Published On: Apr 22 2018 8:08AM | Last Updated: Apr 22 2018 1:31AMमुंबई : प्रतिनिधी

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातून राज्यातील 45 हजारहून अधिक शाळा प्रगत, 61 हजारहून अधिक डिजिटल तर 3 हजारहून अधिक शाळा आयएसओ 9 हजार प्रमाणित शाळा झाल्या असल्याचा दावा शालेय शिक्षण विभागाने केला आहे.

प्रत्येक मूल शिकले पाहिजे, या हेतूने शिक्षण संचालनालयामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येत आहे. पायाभूत चाचण्यांचे आयोजन, वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या शिक्षणासाठीच्या मूलभूत क्षमता आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्या वेळीच प्राप्त व्हाव्यात,विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का व्हावा हाच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत राज्यातील 45 हजार 676 शाळा प्रगत, 61 हजार 247 शाळा डिजिटल तर 3 हजार 325 आयएसओ 9000 प्रमाणित शाळा झाल्या असल्याचा दावा केला आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वयोगटानुसार मुलभूत क्षमता किती प्राप्त झालेल्या आहेत याची पडताळणी या पायाभूत चाचण्यांदवारे होते. या चाचण्यांचे वैशिष्ट्य असे, केवळ विद्यार्थ्यांचे वैयक्तिक मूल्यमापन किंवा त्याने/तिने किती गुण मिळवले हे तपासून पाहणे हे या चाचण्यांचे उद्दिष्ट नाही तर विद्यार्थ्याला नेमके किती समजले आहे, त्याला कोणता भाग अजिबातच कळलेला नाही, एखाद्या विषयातला नेमका कोणता भाग मुलांना समजायला अवघड जातोय, कोणता भाग जास्त सुलभ करुन शिकवणे आवश्यक आहे, हे शिक्षकांना या पायाभूत चाचण्यांच्या मूल्यमापनातून कळावे हा उद्देश असल्याचेही शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

Tags : Mumbai, More than 61 thousand, School Digital, Mumbai news,