Wed, Mar 27, 2019 06:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयावर ९ तारखेला गायी, म्हशींसह मोर्चा

मंत्रालयावर ९ तारखेला गायी, म्हशींसह मोर्चा

Published On: May 06 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 1:48AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सरकारने निश्‍चित केल्याप्रमाणे गायीच्या दुधाला 27 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 36 रुपये दर मिळावा, यासाठी राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाला आता धार येऊ लागली आहे. दूध उत्पादकांची लूट करणार्‍या सहकारी संघावर कारवाई करण्याचा सरकारने इशारा दिला असला तरी आपल्या मागण्यासाठी प्रहार संघटनेच्यावतीने 9 मे रोजी मंत्रालयावर गायी, म्हशींसह मोर्चा काढण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा पहिला मोर्चा असल्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने दिला आहे.

दूध उत्पादक रस्त्यावर उतरले असतानाही सहकारी आणि खाजगी दूध संघाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. या आंदोलनाचे लोण शहरांकडून थेट गावात धडकल्याने आता आंदोलनाला अधिक धार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक आंदोलकांनी मोफत दूध वाटप कार्यक्रम सुरु केले आहेत. तरीही सरकारकडून दखल घेतली जात नसल्यामुळे मंत्रालयावर गाई, म्हशींसह मोर्चा न्यावा लागत असल्याची खंत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली.

आंदोलन आक्रमक करण्याचा बच्चू कडूंचा इशारा

सरकारने जाहीर केलेलाच दर दुधाला मिळावा ही आमची मुख्य मागणी आहे. तसेच सरकारच्या आदेशाचे पालन न करणार्‍या दूध संघांवर कारवाई व शेतकर्‍यांची लूट करणार्‍या खाजगी दूध संघांवर सरकारने नियंत्रण आणावे. सध्या या संस्थांवर कोणतेच नियंत्रण नाही. तसेच सरकारलाही कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने खाजगी दूध संघ शेतकर्‍यांना लुबाडत आहेत. आमचा मोर्चा येण्यापूर्वीच सरकारने निर्णय न घेतल्यास आंदोलन आक्रमक करु, असा इशाराही आमदार कडू यांनी दिला आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Morcha with cows, buffaloes, on 9th, ministry,