Fri, Dec 13, 2019 18:14



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून; सत्ताधारी करणार मतांची बेगमी

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून; सत्ताधारी करणार मतांची बेगमी

Published On: Jun 17 2019 2:11AM | Last Updated: Jun 17 2019 2:11AM




मुंबई : उदय तानपाठक

विरोधकांमध्ये फूट पाडून थेट विरोधी पक्षनेताच सरकारमध्ये सहभागी करून मुख्यमंत्र्यांनी षटकार मारलेला असताना, सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विरोधकांसाठी त्रासदायकच ठरणार आहे. काही महिन्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून या अधिवेशनात होणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकात सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू होण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीला अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. अशा परिस्थितीत नामोहरम झालेले विरोधी पक्ष आता सत्ताधार्‍यांना कसे तोंड देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री बिनघोर, तर विरोधक भेदरेलेले अशी स्थिती निर्माण झाली आहे. या विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहजपणे विरोधकांवर मात करतील, अशी चर्चा आहे. मात्र, निवडणुकीस सामोरे जायचे असल्याने राज्यातल्या दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधक आणि काही प्रमाणात सत्ताधारी आमदारांकडूनही गदारोळ केला जाण्याची शक्यता आहे.
शिवाय गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनी ओढलेले ताशेरे, राज्यातील वाढती गुन्हेगारी अशा विषयांवर ते किती आक्रमक होतील, हे पहावे लागेल. राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते असताना मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे ठगांचे सरकार असल्याची जहरी टीका त्यांनी केली होती. आता याच सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधकांचे टोमणे त्यांना सहन करावे लागणार आहेत.

काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली असली, तरी ते तसे मवाळ स्वभावाचे असल्याने सरकारवर टीका करताना आक्रमक होणार का? हा प्रश्‍नच आहे. नाही म्हणायला विधानसभेतले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आक्रमक असले, तरी त्यांना सभागृहात अडवण्याची तयारी सत्ताधारी पक्षानेही केली आहेच! काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असला, तरी खिळखळ्या झालेल्या या पक्षाला आणखी कमजोर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून खचितच होणार आहे. राष्ट्रवादीकडे अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासारखे आक्रमक आणि अभ्यासू नेते असले तरी सत्तारूढ पक्षाच्या दबावतंत्रापुढे त्यांची आक्रमकता किती टिकेल, याची शंकाच आहे.

उद्या अतिरिक्त अर्थसंकल्प

मंगळवारी विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अतिरिक्त अर्थसंकल्प मांडणार आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात जनतेला खूश करणार्‍या सवलतींचा लाभ देण्याचा प्रयत्न करतील. लोकसभेत सर्वच घटकांनी भाजप-शिवसेनेला मते दिली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय, कष्टकरी यांच्यासह दुर्बल घटकांना वाढत्या वित्तीय तुटीचे भान ठेवूनच सवलती देण्याचा प्रयत्न सरकारकडून होईल.