Tue, Nov 19, 2019 11:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मान्सून मंगळवारी तळकोकणात!

मान्सून मंगळवारी तळकोकणात!

Published On: Jun 16 2019 1:48AM | Last Updated: Jun 16 2019 1:39AM
मुंबई/पुणे : प्रतिनिधी

वरुणराजाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील तमाम नागरिकांना वेधशाळेने सुखद वार्ता दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) येत्या मंगळवारी तळकोकण, दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी दाखल होईल, तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारी तो डेरेदाखल होणार आहे. 

वायू चक्रीवादळामुळे थबकलेला मान्सून तब्बल सात दिवसांनंतर केरळातून पुढे सरकला. शनिवारी त्याची उत्तर सीमा (नॉर्दन लिमिट) मंगळुरू, म्हैसूर, सालेम, आगरताळा अशी होती. 2-3 दिवसांत मान्सून कर्नाटकचा बहुतांश भाग, पूर्व-मध्य अरबी समुद्राचा बहुतांश भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, सिक्कीम येथे तो दाखल होईल. पुढील दोन दिवस कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.