Sat, May 25, 2019 23:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मान्सून धिंगाणा

मान्सून धिंगाणा

Published On: Jun 10 2018 1:52AM | Last Updated: Jun 10 2018 1:48AMघालत आला!मुंबई/ठाणे : प्रतिनिधी 

मुंबईत मान्सून शनिवारी दाखल झाला तो धिंगाणा घालतच. शनिवारी पहाटे 4 पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे हिन्दमातासह सायन, सरदार हॉटेल, परळ, भायखळा पोलीस स्टेशन आदींसह 27 ठिकाणी गुडघाभर पाणी तुंबले. परिणामी रस्त्यांवरील वाहतूक आणि मुंबईची लाईफलाईनही विस्कटली. मध्य रेल्वेची मेन व हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. तर, पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावत होत्या. ठाण्यातही आठ तासांत 90 मिमी पाऊस कोसळला व वर्तकनगरच्या पोलीस वसाहतीमधील चार आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याजवळील तीन अशा सात धोकादायक इमारतींमधील 330 पोलीस कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यात आले. भिवंडीतही शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हाहाकार उडवला असून, 60 घरांसह रोशनबागच्या मोमीन मशिदीतही  पाणी शिरले.  

तुंबई

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत यंदा पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा सत्ताधारी शिवसेनेसह पालिका प्रशासनाकडून केला जात होता. मात्र प्रत्यक्षात पावसाने संपूर्ण मुंबई तुंबवून टाकली. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. शहरातील परळ, हिंदमाता, धारावी आदी भागात आठ तासांत 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे हिंदमातासह परळ, प्रतीक्षा नगर, किंग्ज सर्कल, सायन रोड क्रमांक 24, बांद्रा टॉकीज आदी भागात गुडघाभर पाणी तुंबले होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिकेने संपूर्ण शहरात 64 पाणीउपसा पंप सुरू केले. त्यामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत या भागातील पाण्याचा निचरा झाला. सायन रेल्वेमार्गावर पाणी आल्याने मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणेदरम्यानची लोकलसेवा काही काळ ठप्प पडली होती. तर हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 30 ते 35 मिनिटे विलंबाने धावत होत्या. पश्‍चिम रेल्वे मार्गावर कुठेही पाणी तुंबले नसले तरी, जोरदार पावसामुळे या मार्गावरील लोकलचा वेग मंदावला. त्यामुळे दुपारपर्यंत या मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत होत्या. 

पावसाच्या जोरदार मार्‍यामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यासह सायन, दादर टी. टी., परळ, शिवडी, भायखळा, माझगाव, डी. एन. रोड फोर्ट, वरळी, दादर, माहीम आदी भागात वाहतूक कोंडी झाली होती. तर पश्‍चिम उपनगरातील एस. व्ही. रोड, लिंक रोड, पश्‍चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व उपनगरात लालबहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस मार्ग) आदी रस्त्यांवर सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तासाभराचा प्रवास दीड ते दोन तासांवर गेला. दुपारनंतर पाऊस ओसरल्यामुळे शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले. पण सायंकाळी 4 वाजल्यानंतर पुन्हा शहर व उपनगरात पावसाच्या तुरळक सरींसह जोरदार सरी पडू लागल्यामुळे सकल भागात पाणी शिरले होते. 

पालिका आयुक्त रस्त्यावर 

पावसाने मुंबई तुंबवल्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रस्त्यावर उतरून, पाणी भरलेल्या हिंदमातासह अन्य भागांची पाहणी केली. पाण्याचा त्वरित निचरा करण्यासाठी पाणीउपसा पंप सुरू करण्यासह पंपिंग स्टेशन सुरू करण्याचे आदेश दिले. पालिका आयुक्तांच्या पाहणीनंतर पालिकेचे सुमारे 3 हजार कर्मचारी ज्या भागात पाणी तुंबते तेथे तैनात करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. 

दरम्यान शहराच्या काही भागांत पाणी तुंबले असले तरी, यंदा कुर्लासह पश्‍चिम उपनगरातील मीलन सबवेसह अंधेरी, खार, मालाड, दहिसर सबवेसह ओबेरॉय मॉल, जयभारत कॉलनी, लोखंडवाला सर्कल, श्रीकृष्ण हॉल, आनंदनगर, अंधेरी-कुर्ला रोड आदी भागात पाणी न तुंबल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र शहरापेक्षा उपनगरांत कमी पाऊस झाल्यामुळे पाणी न तुंबल्याचे उपनगरवासीयांचे म्हणणे आहे.

लाईफलाईन विस्कटली!

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सायन, माटुंगा, करी रोड, कुर्ला येथे रेल्वे स्टेशनलगतचा रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली. तब्बल 40 ते 45 मिनिटे विलंबाने धावणार्‍या गाड्यांमुळे रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले होते. दुसरा शनिवार असल्यामुळे शासकीय व निमशासकीय, बँका यांना सुटी होती. त्यामुळे हजारो मुंबईकरांना होणारा त्रास वाचला.

मुंबईत पाऊस पडला की, पहिल्यांदा मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणे व हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा ठप्प पडते. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणे मार्गावर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल व बांद्रा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे रुळावर पाणी आल्याने गाड्यांचा वेग प्रतितास 20 किमीवर आला. त्यामुळे लोकल ठिकठिकाणी अडकून पडल्या. रुळावर पाणी असल्यामुळे अनेक प्रवासी लोकलमध्ये अडकून पडले. तर स्टेशनवर विलंबाने येणार्‍या लोकलमुळे सीएसएमटीसह मस्जिद, भायखळा, करी रोड, परळ, दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड व ठाणे या प्रमुख रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी केली होती.

तब्बल 40 ते 45 मिनिटे विलंबाने धावणार्‍या लोकलमुळे प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले. हार्बर मार्गावर कुर्ला येथे पाणी तुंबल्यामुळे अनेक गाड्या चुनाभट्टी व वडाळा स्टेशनवर अडकून पडल्या. वांद्रेकडे जाणार्‍या लोकलही विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांनी चर्चगेट गाठून व्हाया पश्‍चिम रेल्वेमार्गे प्रवास केला. दरम्यान पावसामुळे पश्‍चिम रेल्वेच्या लोकलही 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत असल्यामुळे दादरसह वांद्रे, अंधेरी, गोरेगाव व बोरिवली स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. सायंकाळी पुन्हा पावसाने जोर पकडल्यामुळे मध्य व पश्‍चिम रेल्वेची उपनगरीय सेवा पुन्हा कोलमडली.