Tue, Apr 23, 2019 20:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एप्रिल महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होेणार मोनोरेल!

एप्रिल महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होेणार मोनोरेल!

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी

बहुप्रतीक्षेत असलेली मोनो अखेर एप्रिल महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होेणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त 15 मार्चपूर्वी या प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. या औपचारीकतेनंतर या मार्गावरील मोनो सुरू होण्याची तारीख निश्‍चित करण्यात येणार आहे. 

गेल्या तीन वर्षांपूर्वीच सेवेत दाखल झालेला चेंबूर ते वडाळा हा मोनोचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2017 पासून बंद आहे. तर वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही. हे दोन्ही टप्पे एकत्रितपणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या टप्प्यात सुरू होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्पष्ट केलेे. मोनोरेलच्या दोन्ही टप्प्यांवर मोनो चालवण्यासाठी आणि देखभालीसाठी एमएमआरडीएमार्फत निविदा मागवण्यात आल्या आहेत, मात्र मोनोचा चेंबूर ते वडाळा दरम्यानचा पहिला टप्पा तोट्यात असल्याने कोणीही कंत्राटदार पुढे आलेला नाही. यामुळे एमएमआरडीए प्रशासनास चौथ्यांदा निविदांची मुदत वाढवावी लागली आहे. मोनो चालवण्यासाठी वाढवण्यात आलेल्या निविदा आता 12 मार्चला खुल्या करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. चेंबूर ते वडाळा हा मोनोरेलचा पहिला टप्पा 2014 सालामध्ये सुरू करण्यात आला होता. वडाळा ते जेकब सर्कलपर्यंतचा दुसरा टप्पा तेव्हापासून रखडलेलाच आहे. पहिल्या टप्प्याला मुंबईकरांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने दररोज एमएमआरडीएचे लाखोंचे नुकसान होत आहे.