Fri, Jul 19, 2019 05:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोनोरेलला लागलेले ग्रहण काही सुटेना!

मोनोरेलला लागलेले ग्रहण काही सुटेना!

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी 

मोनोरेलच्या मार्गातील अडथळे संपण्याचे नाव घेत नाहीत. 10 महिन्यांपासून बंद असलेली ही रेल्वे चेंबूर ते वडाळा मार्गावरून शनिवारी पुन्हा धावली. नागरिकांनीही तिचे उत्साहात स्वागत केले, मात्र हा आनंद अल्पजीवी ठरला. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास इंटरनेट केबल चाकामध्ये अडकल्यामुळे चेंबूर नाक्यावर मोनोरेल बंद पडली. नंतर दुसर्‍यांदा व्ही.एन.पी.आणि आर.सी.स्थानकाजवळ ती रखडली.

मोनोच्या रखडपट्टीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी अनेक प्रवासी मोनोमध्ये अडकले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर मोनोचा तांत्रिक बिघाड दूर झाला. मोनोरेलमध्ये छोटासा तांत्रिक बिघाड झाला होता. तो आता सोडवण्यात आला आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

नोव्हेंबर 2017 मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली होती. या आगीत मोनोचे 25 कोटींचे नुकसान झाले. तेव्हापासून मोनो बंद होती. दहा महिन्यांपासून बंद असलेली देशातील पहिली मोनो रेल्वे शनिवारपासून पुन्हा सुरू झाली. देशातील ही पहिली मोनो रेल्वे फेब्रुवारी 2014 रोजी मुंबईतील चेंबूर ते वडाळा मार्गावर धावली होती. नव्या वेळापत्रकानुसार, चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मोनो पुन्हा धावणार आहे. मोनो रेल्वेचा हा टप्पा सुरू करताना प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याचा एमएमआरडीए प्रशासनाचा विचार होता. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असे एक सदस्यीय समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार प्रवासी भाड्यात वाढ न करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. मात्र, असे असले तरी मोनोची प्रवाशांना तशी साथ मिळत नाही. जे प्रवासी मोनोवर भरवसा ठेवून प्रवास करतात त्यांना आता हा प्रवास बिनभरवशाचा वाटू लागला आहे. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा द्यायचा असेल तर मोनोच्या अडचणी दूर कराव्या लागतील.