Mon, Mar 25, 2019 04:56
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  मोनोचा दुसरा टप्पा याच महिन्यात

 मोनोचा दुसरा टप्पा याच महिन्यात

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी 

वडाळा ते जेकब सर्कल हा मोनोचा दुसर्‍या टप्प्या फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत सुरु करण्याची शक्यता आहे.  येत्या काही दिवसांत रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून दुसर्‍या टप्प्याची पाहणी केली जाणार असून, त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मोनोचा दुसरा टप्पा कार्यान्वित होईल एमएमआरडीए प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.  

नोव्हेंबर महिन्यामध्ये मोनोच्या म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ पहाटे लागलेल्या आगीनंतर वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्याच्या मार्गावरील मोनोची सेवाच बंद करण्यात आली होती. ही सेवा अद्याप बंदच आहे. दुसर्‍या टप्प्याला रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पहिला आणि दुसरा टप्पा असे दोन्ही टप्पे सुरू होतील. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीत सुरक्षा आयुक्तालय पाहणीस येणार आहे, त्यामुळे मोनो लवकरच सुरू होईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. एखादी सेवा सरू झाली की लोकांचा नेमका प्रतिसाद कसा मिळतो, हे नेमकेपणाने सांगता येत नाही. काहीवेळेससुरुवातीला प्रतिसाद कमी असतो, मात्र नंतर मात्र तो वाढतो. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो-1 मार्गावरील प्रवाशांची संख्या प्रारंभी दोन लाख होती. ही संख्या आता चार लाखांवर गेली आहे, याकडे लक्ष वेधतानाच मोनोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा मदान यांनी व्यक्त केली.

वडाळा ते सातरस्ता या संपूर्ण मार्गावर मोनोची सेवा सुरू होणार असली तरी मोनोगाड्यांची अपुरी संख्या हे चिंतेचे कारण आहे. मोनोच्या ताब्यात सध्या फक्त सहाच गाड्या आहेत. चार गाड्या दुरुस्तीसाठी यार्डात आहेत. मोनोचे व्यवस्थापन करणारी स्कोमी कंपनी आणखी पाच गाड्या देणार आहे. पण त्या कधी देणार हे अजून निश्चित नाही. वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्यात प्रवाशांचा प्रतिसाद खूपच कमी असल्याने गाड्यांची संख्या कमी असूनही झळ बसली नव्हती. मात्र सातरस्त्यापर्यंतचा पुढला टप्पा हा दाट वस्तीचा तसेच पूर्व आणि पश्चिम रेल्वेला समांतर असल्याने या टप्प्यात प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी सहा गाड्यांवर भिस्त असणार आहे. गाड्याच कमी असल्याने 20 ते 25 मिनिटांच्या अंतराने गाडी स्थानकात येईल.