होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पैसे वसुलीच्या वादातून सावकाराच्या घरावर गोळीबार

पैसे वसुलीच्या वादातून सावकाराच्या घरावर गोळीबार

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:02AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

पैसे वसुलीच्या वादातून सावकाराच्या घरावर अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना शनिवारी रात्री डोंबिवलीत घडली. या गोळीबारात सावकार आणि त्याच्या घरातील कुणीही जखमी झाले नाही.

डोंबिवलीजवळ भोपर रोडला नांदिवली गाव आहे. या गावात व्यावसायिक गीतेश पाटील राहतात. त्यांचा सावकारीचाही व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी दिव्याजवळच्या आगासन गावात राहणार्‍या महेंद्र खोत यांना त्यांनी व्याजाने साडेतीन लाख रुपये दिले होते. मात्र वारंवार मागणी करूनही व्याज तर नाहीच, पण मुद्दलही परत देण्यास खोत हा टाळाटाळ करत होता. अखेर शनिवारी रात्री पाटील यांनी खोत याला फोन करून दिलेले पैसे परत मागितले. मात्र खोत याने त्यांना दमदाटी केली. त्यानंतर खोत याच्यासह तेजू मुंडे, निलेश मुंडे आणि त्यांचे 20 ते 25 साथीदार मध्यरात्री 12.30 ते 1 च्या दरम्यान नांदिवली गावात घुसले. वेगवेगळ्या वाहनांतून आलेल्या या टोळक्याने पाटील यांच्या घरावर हल्ला चढवला. 

घराला असलेल्या खिडकीच्या काचा फोडून त्यातून घरात गोळीबारही करण्यात आला. सुदैवाने गोळ्या चुकवल्याने पाटील हे थोडक्यात बचावले. या प्रकाराची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.