चिनी वस्तूंचा पैसा त्यांच्या लष्कराला जात असल्याने चिनी मालावर बहिष्कार घाला!

Last Updated: Jun 07 2020 12:57AM
Responsive image


नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

तुम्ही खरेदी केलेल्या चिनी वस्तूंचा पैसा चिनी लष्कराला जातो. यामुळे भारतीयांनी चिनी उत्पादनांच्या वापरावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे आवाहन जगप्रसिद्ध नामांकित शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी केले आहे. 

त्यांनी एक टॅगलाईनही तयार केली आहे. ‘सेना देगी बुलेट से, नागरिक देंगे वॉलेट से’ आपले सैन्य सीमेवर चीनला उत्तर देत आहे. मात्र आपण आता चीनला बुलेटने नाही तर वॉलेटने चोख उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन वांगचुक यांनी केले आहे.वांगचुक यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

स्वतः चिनी वस्तूंचा वापर बंद करणार

चिनी बनावटीच्या वस्तू तसेच सॉफ्टवेअर वापरणे सोडून द्या. त्याऐवजी भारतीय बनावटीच्या वस्तू आणि सॉफ्टवेअर  वापरण्यास सुरुवात करा, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचे कौतुक त्यांनी केले आहे. तसेच स्वतः एक आठवड्याच्या आत सर्व चिनी वस्तू आणि तंत्रज्ञान वापरणे सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. देशातील प्रत्येक नागरिकाला हा संदेश अन्य 100 लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

चिनी सैन्य रोज पुढे येत आहे 

वृत्तवाहिनीवरील अनेक प्रश्‍नांना वांगचुक यांनी सविस्तर उत्तरे दिली. एका प्रश्‍नावर ते म्हणाले, मी लडाखमध्ये राहतो. दररोज चिनी सैन्य मी पुढे पुढे येत असल्याचे पाहतो. 1962 साली चीनने भारताला फसवले. त्यावेळी आपण काय केले? लडाखमध्ये भारतीय लढाऊ विमाने टेहळणी करतात, तशी चीनचीही विमाने घिरट्या घालतात.

चिनी वस्तूंवाचून अडणार नाही

वीस वर्षांपूर्वी चिनी वस्तू भारतीय बाजारपेठेत होत्या का, असा सवाल करून ते पुढे म्हणाले, चिनी वस्तूंपासून आपले काहीही अडणार नाही. चिनी मालाऐवजी भारतीय अथवा अन्य देशातील वस्तू घ्याव्यात.

पाकची अवस्था गुलामाप्रमाणे

चीन सरकारचे धोरण शोषण करणारे आहे. 140 कोटी मजुरांकडून चीनमध्ये वेठबिगारांप्रमाणे काम करून घेतले जाते. जर कोणी काही बोलले, आवाज उठवला की त्याला गायब केले जाते. पण जग शांत आहे. कारण त्यांना चीनबरोबर व्यापार करायचा आहे. चीनच्या कर्जाखाली श्रीलंका दबली गेली आहे. यामुळे अमंतोता बंदर तर चीनच्या ताब्यात गेले आहे. पाकिस्तान तर चीनच्या कर्जात इतका अडकला आहे की, एखाद्या गुलामाप्रमाणे त्यांची अवस्था होणार आहे, असे ते म्हणाले.

सरकारच चिनी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध का घालत नाही? या प्रश्नावर बोलताना वांगचुक म्हणाले, सरकारला काही निर्णय घेताना कायद्याचे तसेच नियम व अटींचे पालन करावे लागते तसेच देशादेशांमधील संबंधांचा विचार करावा लागतो. त्यामुळे थेट सरकारला आयातीवर निर्बंध लादणे कठीण असू शकते. मात्र देशातील नागरिकांनी स्वत:ला काही निर्बंध लावून घेतले तर निवडीचा हक्‍क नागरिकांना असतो. पण, आपण सरकारची वाट का पाहावी? जर नागरिकांनीच बहिष्कार घालत स्वदेशी वस्तू बनवण्यावर तसेच वापरण्यावर भर दिला तर सरकारकडूनही लोकांच्या वागण्यानुसार आणि इच्छेनुसारच धोरणे ठरवली तसेच बनवली देखील जातात, असे ते म्हणाले.

चीनवर बहिष्कार टाकणे म्हणजे द्वेष परसवण्यासारखे नाही का? या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे म्हणजे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न आजिबात नाही. माझे अनेक मित्र आहेत चीनमध्ये. चिनी लोकांशी आपल्याला काहीच समस्या नाहीत. आपली अडचण चीन सरकारबरोबर आणि त्यांनी आखलेल्या धोरणांशी आहे.

हीच वेळ आहे चीनला धडा शिकवण्याची

आता चीनला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. चीनमध्ये अंतर्गत कलह उफाळला आहे. कोरोना महामारीमागे  चीनचा हात असल्यावर चीनवर सार्‍या जगाचा रोष आहे. चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याची हीच वेळ आहे, असे उद‍्गार सोनम वांगचुक यांनी काढले.

योगगुरू बाबा रामदेव यांचे आवाहन

नवी दिल्‍ली :  चीनला पराभूत करण्यासाठी शस्त्रांपेक्षा चिनी उत्पादनांवर बहिष्कार घातला पाहिजे. अगदी टॉयलेट पेपर पासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत असंख्य चिनी उत्पादने आपल्याकडे आयात केली जातात. याच्याच जोरावर भारतामध्ये चीनचा 15 ते 20 लाख कोटींचा व्यवसाय आहे, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपली सेना पूर्णपणे सक्षम आहे. चीनला पराभूत करण्यासाठी त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार घातला पाहिजे, याकरिता मोठे ठराव करावे लागतील. मात्र चीनला धडा शिकवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. याकरता प्रत्येक भारतीयाने चिनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे, असे ते म्हणाले.