मुंबई : वार्ताहर
भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी किरकोळ वादातून झालेल्या दगडफेकीचे तीव्र पडसाद मंगळवारी चेंबूर, गोवंडी, मानखुर्द परिसरात उमटलेले पाहायला मिळाले. घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी जनतेचा राग अनावर होवून 30 हून अधिक बसेसची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत तीन पोलीस, बेस्टचालक जखमी झाला आहे.
सकाळी 9 वाजता चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमधील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. ठाणे व मुंबईकडे जाणार्या दोन्ही वाहिन्या पूर्णतः खोळंबल्या होत्या. सकाळी 10 वाजता आरपीआयचे कार्यकर्ते सायन-पनवेल मार्गावरील चेंबूर नाका येथे रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने मुंबई व पनवेलकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून काही काळा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला होता. मात्र, दुपारी दोनच्या दरम्यान पुन्हा आदोलकांनी चेंबूर नाका येथे रस्तारोको करून येथील शिवसेनेच्या शाखेवर दगडफेक केली. आजूबाजूच्या बसेस, रिक्षा, खासगी वाहने यांची तोडफोड केली. डायमंड गार्डन परिसरातील अनेक दुकाने व हॉटेलची तोडफोड केली.
सकाळपासून चेंबूरच्या पी. एल. लोखंडे
मार्गावर वातावरण तापले होते. संतप्त जमावाने परिसरातील दुकाने बंद केली तर अमर महल येथे रास्ता रोको करताना आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संतापलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात टिळकनगर पोलीस ठाण्याचे राजेंद्र भोसले, संदेश लोटणकर, प्रकाश घाडीगावकर हे तीन पोलीस कर्मचारी, एक छायाचित्रकार जखमी झाले आहेत.
ठाण्यात रास्ता रोकोचा प्रयत्न; तीन बसेसवर दगडफेक
ठाणे : प्रतिनिधी
भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद मंगळवारी ठाण्यात देखील उमटले. काही अज्ञात आंदोलकांनी वागळे स्टेट, घोडबंदर रोड आणि खोपट परिसरात पालिका परिवहन सेवेच्या तीन बसेसवर तुरळक दगडफेक केली. तर आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही काळ पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने तणाव निवळला.
सुरक्षेचा उपाय म्हणून ठाण्यातील 15 ते 20 कार्यकर्त्यांना कोपरी तर 3 जणांना वागळे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नेहमीच गर्दीने गजबजलेल्या ठाणे स्थानकाबाहेरील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सतत गर्दीने फुलून निघणार्या स्थानक परिसरात भरदुपारी शांतता दिसून आली. तर अनेक कार्यालयांना दुपारीच सुट्टी देण्यात आली. काही अनुचित घडल्यास लोकलचा खोळंबा होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन चाकरमान्यांनी घर गाठण्यासाठी धावपळ केली होती. ठाण्यात सर्वत्र शांतता असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवून नये, असे आवाहन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले.
ठाण्यात मंगळवारी सकाळपासूनच तणावपूर्ण शांतता होती. आरपीआयसह काही दलित संघटनांनी शहरात विविध ठिकाणी आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदवला. आरपीआय पक्षाचे ठाणे जिल्हाअध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी कोपरी येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले. तसेच कॅडबरी कंपनी परिसरातील उड्डाण पुलाच्या खालीदेखील रास्ता रोको करण्यात आला. मात्र वेळीच पोलिसांनी आंदोलकांना अडवून त्यांना ताब्यात घेतले. त्यातच शहरातील लोकमान्य नगर, वर्तकनगर, ठाणे स्थानक परिसरात काही भागात दुकान बंद करण्यात आली होती.
हार्बर मार्गावर आंबेडकरी कार्यकर्ते रुळांवर
ठाणे/मुंबई : प्रतिनिधी
भीमा-कोरेगावमधील वादाचे पडसाद मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये उमटले आहेत. मुंबईच्या चेंबूर, गोवंडी परिसरातील आंदोलनकर्त्यांनी अचानक हार्बर लाईनवरील चेंबूर-गोवंडी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळावर उतरून आंदोलन सुरू केले. दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेले आंदोलन सांयकाळी पाचवाजेपर्यंत सुरू
होते.
अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करून मार्ग मोकळा केला. त्या वेळेत हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व लोकल सेवा तीन तास ठप्प झाली होती. या मार्गावरील सर्वच सर्व लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका या मार्गावरून प्रवास करणार्या अबालवृद्धांसह प्रवाशांना बसला आणि हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तीन तासानंतर 5 वाजून 5 मिनिटांनी पहिली बेलापूर लोकल सोडण्यात आली.
आंदोलनामुळे प्रवाशांना इतर रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास केला. काही प्रवाशांनी खासगी वाहनाने प्रवास केला. अनेक प्रवासी हे रेल्वे स्थानकातच तीन तास लोकलची प्रतीक्षा करीत राहिले. त्याचवेळी ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील काही दुकाने बंद करण्यात आल्यानंतर अफवांच्या बाजारात पेव फुटले.
मध्य रेल्वे पाच मिनिटे उशिराने धावत होती. तरी देखील ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी होती. रेल्वेस्थानक आणि परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वेच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने रेल्वेमार्ग तसेच स्थानक दरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे सुरक्षा बळ पोलीस आयुक्त सचिन बलोदे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.