होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चेंबूरमधील विद्यार्थिनींचा पाठलाग करून विनयभंग

चेंबूरमधील विद्यार्थिनींचा पाठलाग करून विनयभंग

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 1:22AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

शिकवणीला जात असलेल्या दोन मुलींची छेड काढून मारहाण केल्याचेप्रकरण ताजे असतानाच चेंबुरमधील दोन विद्यार्थीनींचा पाठलाग करुन विनयभंग करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना चेंबुरमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे शाळेत जात असलेल्या मुली असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना गजाआड केले आहे.

चेंबुरच्या ठक्करबाप्पा कॉलनी परिसरात राहात असलेली 17 वर्षीय मुलगी बारावीत शिकत आहे. तिच्यावर वाईट नजर पडलेल्या याच परिसरातील तरुणाने 16 डिसेंबरपासून तिचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला मुलीने याकडे दुर्लक्ष केला. मात्र तरुणाने अश्‍लिल भाषेत तिची छेड काढण्यास सुरूवात केली. तरुणाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून मुलीने घडलाप्रकार आईवडीलांना सांगितला. कुटूंबियांच्या मदतीने मुलीने गुरूवारी नेहरुनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून विनयभंगाच्या भादंवी कलम 354 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 12 अन्वये गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

दुसर्‍या घटनेमध्ये, चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात राहात असलेली मुलगी दहावीमध्ये शिकते. तिच्यावर एकतर्फी प्रेम करत असलेल्या जितेंद्र खोरवाल (35) तरुणाने या मुलीचा पाठलाग करत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलीने हा प्रकार कुटूंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी खोरवाल याला समज दिली होती. मात्र शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही मुलगी घराबाहेर पडताच खोरवाल याने तिला वाटेत अडून तिचा विनयभंग केला. मुलीने घडलाप्रकार कुटूंबियांना सांगत चेंबुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून विनयभंगाच्या भादंवी कलम 354 (अ) (1), 504 आणि 509 अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.