Wed, May 22, 2019 10:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात शेअरिंग रिक्षात विद्यार्थिनीचा  विनयभंग ; सहप्रवाशाला अटक

ठाण्यात शेअरिंग रिक्षात विद्यार्थिनीचा  विनयभंग ; सहप्रवाशाला अटक

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:32AMठाणे : प्रतिनिधी 

शेअरिंग रिक्षात शेजारी बसलेल्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी रात्री नौपाडा परिसरात घडली. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी 29 वर्षीय सागर हुंबरे (रा.लक्ष्मीनगर,चिरागनगर, ठाणे) या तरुणास अटक केल्यानंतर  न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

कोलबाड परिसरात राहणारी 19 वर्षीय विद्यार्थिनी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावदेवी ते कॅडबरी सिग्नल शेअर रिक्षाने प्रवास करीत होती. तेव्हा, रिक्षात शेजारी बसलेल्या सागर हुंबरे याने पीडित विद्यार्थिनीशी अश्लील चाळे सुरु केले. त्यामुळे संतप्त झालेल्या युवतीने नौपाडा पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला मध्यरात्रीच ताब्यात घेतले.

रिक्षा नेहमीच वादग्रस्त!

ठाण्यातील तीनहात नाका येथून रिक्षात बसून घोडबंदर रोडवरील घराकडे निघालेल्या 23 वर्षीय तरुणीसोबत रिक्षातील सहप्रवाशी व रिक्षा चालकाने विनयंभग आणि मारहाण केल्याचा प्रकार जून 2017 मध्ये घडला होता. त्यानी तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला होता. या तरुणीने विरोध करताच रिक्षाचालकाने तिला पोखरण रोडवर एका कंपनीच्या गेटसमोर फेकून दिले होते.

रिक्षात बसलेल्या एका 22 वर्षीय युवतीला अश्लील इशारे करून तिला मारहाण करणार्‍या चार जणांना ऑगस्ट 2017 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. विशेष म्हणजे विनयभंग करणारे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनवरील ऑन ड्युटी कर्मचारी होते. ठाण्यात दोन वर्षांपूर्वी स्वप्नाली लाड या तरुणीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात तिला रिक्षातून फेकल्याची घटना घडली होती.

मुजोर रिक्षा चालकांना लगाम घालण्यासाठी ठाणे पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाने अनेक उपाययोजनांच्या घोषणा केल्या होत्या. त्यात स्मार्ट कार्ड योजना, प्रत्येक रिक्षात जीपीआरएस सिस्टीम, बारकोड पद्धत, रिक्षा चालकाचे नाव व परवान्याची प्रत समोर लावण्याचे नियम असे अनेक योजनांचा समावेश होता. मात्र गेल्या काळात या सार्‍याच योजना रिक्षा चालकांनी बासनात गुंढाळल्याचे चित्र दिसून येत आहे.