होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थिनींचा विनयभंग : आश्रमशाळा अधीक्षकास अटक

विद्यार्थिनींचा विनयभंग : आश्रमशाळा अधीक्षकास अटक

Published On: Mar 04 2018 2:05AM | Last Updated: Mar 04 2018 1:57AMतलासरी : वार्ताहर

डहाणू आदिवासी प्रकल्प विभागांतर्गत धामणगाव शासकीय आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थिनींशी आश्रमशाळा अधीक्षकाने अश्‍लील वर्तन, संभाषण करून त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार नराधमाला तलासरी पोलिसांनी अटक केली. सूर्यकांत बागल असे त्याचे नाव असून, त्याच्यावर अ‍ॅट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सूर्यकांत बागल, मुलींना घरून किंवा नातेवाईकांचा फोन आल्याचे अथवा अन्य खोटी कारणे सांगून आपल्या कार्यालयात बोलवायचा. त्यानंतर त्यांच्यासोबत अश्‍लील वर्तन, संभाषण करून अश्‍लील व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण करायचा. या प्रकाराची दहावीतील एका पीडित मुलीने पत्राद्वारे शाळेतच असलेल्या चुलत भावाला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत मुलीच्या भावाने गावकर्‍यांच्या मदतीने वसतिगृहात जाऊन सूर्यकांतला जाब विचारला. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. सूर्यकांतने यापूर्वी अनेकदा अनेक विद्यार्थिनींसोबत अश्‍लील वर्तन केले आहे. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी दडपणाखाली आहेत.

सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने 12 विद्यार्थिनी वसतिगृहात राहून परीक्षा देत आहेत. मात्र, या धक्कादायक प्रकारामुळे त्या मानसिक तणावाखाली आहेत. आदिवासी प्रकल्पांतर्गत मुलींच्या वसतिगृहात लैंगिक शोषणाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना रिक्त महिला अधीक्षक पदांबाबत सरकार काय भूमिका घेणार, असा सवाल संतप्त पालकांनी केला आहे. या घटना रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणीही पालकांनी केली आहे.