Tue, Apr 23, 2019 10:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुटखा विक्रेत्यांना ‘मोक्‍का’ लावणार : बापट 

गुटखा विक्रेत्यांना ‘मोक्‍का’ लावणार : बापट 

Published On: Mar 17 2018 1:32AM | Last Updated: Mar 17 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी

तंबाखूमिश्रित मावा, खर्रा, सुगंधी  सुपारी यावर बंदी असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत असल्याचे आढळून येत आहे. गुटखा विक्रेत्यांच्या संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार मोडून काढण्यासाठी आवश्यकता भासल्यास ‘मोक्‍का’ लावण्यासही सरकार मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा अन्‍न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत दिला.

राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात चोरून गुटखा विकला जातो. तरुण पिढी बरबाद करणार्‍या या घातक प्रकाराला पायबंद घाला, अशी मागणी तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून परिणय फुके यांनी केली. शिवसेनेचे अनिल परब यांनी मुंबईत अनेक ठिकाणी गुटखा, सुगंधी सुपारी तयार करण्याचे छोटेछोटे उद्योग चालतात. त्यांची तक्रार केल्यावरही फारशी गांभीर्याने कारवाई केली जात नाही. गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विकणार्‍यांची खूप मोठी साखळी कार्यरत असून, हा संघटित गुन्हेगारीचाच एक प्रकार असल्याने ‘मोक्‍का’सारखी कारवाई करण्याची सूचना केली. 

त्यावर उत्तर देताना अन्‍न व औषध प्रशासन मंत्री बापट यांनी, गुटखाबंदी कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येत आहेत. यापुढे हा गुन्हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून दोषी आढळल्यास किमान सात वर्षांची शिक्षा तसेच आवश्यकता पडल्यास ‘मोक्‍का’देखील लावण्यात येणार आहे. या शिक्षेबाबत माहिती व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार लोक प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी काही खासगी संस्थाही पुढे आल्याचे सांगितले. 

भरारी पथकांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी लक्ष ठेवण्यात येत आहे. गुटखा किंवा बंदी असलेल्या पदार्थांची विक्री कुठे होत असल्याची तक्रार आल्यास अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्या बाहेरच्या अधिकार्‍यांकडून त्या ठिकाणी धाड टाकून कारवाई करण्यात येईल. विभागाचे अधिकारी गुटखा विक्रेत्यांना कुठे मदत करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Tags : mumbai, mumbai news, Gutkha dealers, criminals, Mokka,