होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोजोसच्या मालकांवर गुन्हे दाखल; युग पाठकला अटक

मोजोसच्या मालकांवर गुन्हे दाखल; युग पाठकला अटक

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 2:02AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला लागलेल्या आगीप्रकरणी अग्निशमन दलाने अहवाल सादर केल्यानंतर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मोजोस बिस्त्रोचे मालक युग पाठक आणि युग टुली यांची नावे नोंदविली आहेत. यातील युग पाठक याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तो पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आहे.

लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीत असलेल्या वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये 14 जणांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. प्राथमिक तपासाअंती ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी आग लागण्यास जबाबदार ठरवत वन अबव्हचे क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह सी ग्रेड हॉस्पिटॅलिटी, तसेच एन्टरटेन्मेंट एलएलपी कंपनीचे मालक, व्यवस्थापक, संचालक व अन्य जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

पोलिसांकडून तपास सुरू असतानाच ही आग मोजोस बिस्त्रो पबमुळे लागल्याचा अहवाल अग्निशमन दलाने शुक्रवारी दिला. त्यानुसार कारवाई मोजोस बिस्त्रोचे मालक पाठक आणि टुली यांची नावे गुन्ह्यात नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील पाठक याला अटक करत पोलिसांनी त्याच्यासह मोजोस बिस्त्रोच्या व्यवस्थापकांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. मोजोस बिस्त्रोच्या कर्मचार्‍यांसह या पबमध्ये घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या ग्राहकांचे जाबाब पोलिसांकडून नोंदविण्यात येत आहेत.

पोलिसांनी काय केले

वन अबव्हचे मालक संघवी ब्रदर्स आणि मानकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ते परदेशात पळून जाण्याच्या शक्यतेतून पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली. शोधासाठी पाच पथके रवाना करत तिघांनाही पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले.

पालिकेने चौकशी करत कमला मिलचा मालक रमेश गोवानी, मोजोस बिस्रो पबचा संचालक युग पाठक, ड्युक थुली तसेच रघुवंशी मिलमधील पी-22 पबचा मालक शैलेंद्र सिंघ यांच्याविरुद्ध एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.

संघवी बंधूंना आश्रय देऊन पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये माझगाव परिसरात राहात असलेल्या काका राकेश संघवी, आदित्य संघवी आणि महेंद्रकुमार संघवी यांना भायखळा पोलिसांनी अटक केली. तर वन अबव्हचे व्यवस्थापक केवीन बावा आणि लिसबॉन लोपेज यांना ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली.

संघवी ब्रदर्स, मानकरच्या ठावठिकाण्याची माहिती देणार्‍याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.