होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लालकिल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचेच भाषण : काँग्रेस

लालकिल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचेच भाषण : काँग्रेस

Published On: Aug 16 2018 12:25AM | Last Updated: Aug 15 2018 11:11PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद मोदींनी आज लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण हे निवडणूक प्रचाराचे भाषण होते. मोदींचे हे भाषण लाल किल्ल्यावरील शेवटचे भाषण आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुढील पंतप्रधान हा तुमच्या आमच्या मनातील असेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ खोटे बोलतात. चार वर्ष परदेश वार्‍या करण्यात व जनतेची दिशाभूल करण्यात गेली. पाचव्या वर्षात तरी पंतप्रधान जनतेला सत्य सांगतील अशी अपेक्षा होती पण ती ही फोल ठरली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 70.80 रुपयांवर पोहोचला आहे पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात ध्वजारोहणाप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देशातील पुढील स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी लालकिल्ल्यावरून होणारे भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसाचे होईल, असा आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेली अनेक वर्ष या देशात प्रगतीचा विचार आपण करत होतो. परंतु गेल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये प्रगतीविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होवू लागली आहे. या देशात आतापर्यंत आम्ही जी प्रगती साधली त्यामध्ये आणखी भर पडेल, असा विश्‍वास वाटत होता. तो विश्‍वास फोल ठरला आहे, असे मत व्यक्‍त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ प्रथमच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह  पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवादलाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.