Wed, May 22, 2019 22:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोदी सरकारचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा

मोदी सरकारचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 1:20AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात प्रचंड मोठे विकास कार्य केले असून या चार वर्षात महाराष्ट्राचा सर्वाधिक फायदा झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यापूर्वी केंद्रातील सत्ताधार्‍यांनी नेहमी दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यांना महत्त्व दिले. मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या राज्यांबरोबरच महाराष्ट्राला महत्त्व दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार व प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, मोदी सरकारने अतुलनीय काम केले आहे. वेगवेगळ्या योजनांचा कोट्यवधी लोकांना लाभ झाला आहे. सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्राने आठ हजार कोटी रुपये इतकी आतापर्यंतची सर्वाधिक मदत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा राज्यातील शेतकर्‍यांना फार मोठा लाभ झाला आहे. केंद्र सरकारने राज्यातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मोठ्या संख्येने कोल्ड स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंग प्रकल्प मंजूर केले आहेत. 

राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचन सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 36 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात आतापर्यंतचे महामार्गांचे सर्वाधिक काम सुरू झाले आहे. राज्यात चार हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे काम सुरू झाले असून दहा हजार किलोमीटरच्या कामाची प्रक्रिया चालू आहे.