Sat, Jul 20, 2019 15:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जुगाराच्या पैशांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या

जुगाराच्या पैशांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या

Published On: Apr 25 2018 2:03AM | Last Updated: Apr 25 2018 1:55AMउल्हासनगर : वार्ताहर 

जुगारात हरलेले पैसे परत करण्यावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उल्हासनगरात घडली. हत्येनंतर आरोपी पळून जाण्याच्या बेतात असतानाच गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात त्याला अटक केली. विकी खैरे असे मृत तर वाजीद खान असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

येथील कॅम्प नंबर 3 मधील शांतीनगर परिसरात  सोमवारी सायं. 6 च्या सुमारास विकी आणि वाजीद अन्य मित्रांसोबत पत्ते खेळत होते. जुगारात वाजीद पैसे हरल्यावर त्याने विकीकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. वाद वाढल्यावर विकीने वाजीदला उत्तरप्रदेशात येऊन ठार मारणार, अशी धमकी दिली. यामुळे संतापलेल्या वाजीदने रागाच्या भरात त्याच्याजवळील सुर्‍याने विकीच्या गळा, छातीवर वार केले. त्यामुळे विकी जागीच ठार झाला. 

या हत्येची माहिती मिळताच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांनी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात जाऊन विकीच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता ही हत्या वाजीदने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हत्येनंतर वाजीद कल्याणच्या दर्ग्यात लपून बसेल किंवा उत्तरप्रदेशात पळून जाईल, असा संशय आल्याने गुन्हे अन्वेषणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली महेश तरडे, मनोहर पाटील, अशरुद्दीन शेख, गणेश तोरगल यांच्यासह  एस.के.पवार, उदय पालांडे, भरत नवले, रामदास मिसाळ, विश्वास माने यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी कल्याणचा दर्गा, कल्याण, कसारा रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. रात्री 10 च्या सुमारास कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक 5 वर त्यांना वाजीद घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला ताब्यात घेतले असता जुगारातील पैशांच्या वादातून विकीची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. आरोपीला मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तरडे यांनी दिली.

Tags : Mumbai, Gambling money, friend murdered, Mumbai news,