Sun, Nov 18, 2018 07:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘आता फक्त गोड समज देतो, नंतर सर्व हातातून जाईल’

‘आता फक्त गोड समज देतो, नंतर सर्व हातातून जाईल’

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 06 2018 1:03AMटिटवाळा  :  वार्ताहर

पोलिसांविरुद्धची केस तुम्ही कोर्टात दाखल केली आहे, ती लगेच मागे घ्या. पोलीस जेवढे पैसे देतात तेवढे पैसे घ्या व गप्प बसा. कमी असेल तर सांगा जास्त पैसे मिळतील. पोलिसांच्या विरोधातील केस मागे घ्यायची आहे का, ते सांगा, त्यात तुमचेच भले आहे. तक्रारदार जे आहेत तेच नाही राहिले तर केस रद्द केली जाईल, बघा विचार करा. आता फक्त गोडीत समज देतो नंतर मात्र सर्व काही तुमच्या हातातून जाईल. तक्रारदार यांची काळजी घ्या, असे निनावी पत्र टिटवाळ्यातील आत्महत्या केलेल्या मितेश जगतापच्या कुटुंबियांना आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी जगताप कुटुंबियांनी टिटवाळा पोलीसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. दरम्यान, अशाच प्रकारचा धमकीचा फोनही आला असल्याचे जगताप कुटुंबियांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मितेश जगताप हा आपल्या दुचाकीसह 20 ऑगस्ट 2017 रोजी टिटवाळा पोलीस पेट्रोलिंग करत असताना परिसरात आढळून आला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या दुचाकीला नंबरप्लेट नसल्याने त्याच्याकडे  त्याबाबत विचारपूस करत कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर मितेशचे वडील राजेश जगताप यांनी गाडीची कागदपत्रे आणून दाखवल्यानंतर पोलिसांनी त्याची दुचाकी परत दिली. मात्र, पोलिसांनी मितेशचे जॅकेट आणि मोबाईल काढून घेतला. 

जॅकेट व मोबाईल घेण्यासाठी वारंवार टिटवाळा पोलीस ठाण्यात जाऊनही  त्याला मोबाईल आणि जॅकेट परत देण्यात आले नाही. उलट  खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्याला मानसिक त्रास दिला आणि म्हणूनच त्याने 23 ऑगस्ट 2017 रोजी आत्महत्या केल्याचा आरोप जगताप कुटुंबीयांनी केला होता. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर मितेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन पोलीसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या हे प्रकारण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, जगताप कुटुंबियांना आता पोलिसांच्या उल्लेख असलेले जीवे ठार मारण्याचे पत्र आल्याने पोलिसांसमोरच्या अडचणी वाढल्या असून या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.